मुकुंद रांजणे माथेरान : माथेरानमध्ये विकासाचा स्रोत म्हणून तसेच पर्यायी वाहतूक व्यवस्थेसाठी रोप-वेचे काम टाटा समूहाने हाती घेतले आहे. त्यासाठी मातीचे परीक्षण करण्यासाठी रोप-वेचा मुख्य थांबा असलेल्या माधवजी पॉइंट येथे उत्खननाचे काम वेगात सुरू करण्यात आले आहे.माथेरानच्या पायाभूत सुविधेसाठी आणि पर्यायी मार्ग उपलब्ध होण्यासाठी सरकार दरबारी अनेकदा पाठपुरावा करूनही ठोस उपाययोजना झाली नव्हती. त्यामुळे मागील काही काळात स्थानिक हॉटेलमालकाने रोप-वे सुरू होण्यासाठी केंद्र शासनापर्यंत पाठपुरावा केला होता. त्यानंतर स्थानिकांच्या सततच्या मागणीवरून अखेरीस रोप-वे सुरू करण्यास केंद्र शासनाकडून परवानगी मिळाली आहे. येथील मुख्य थांबा असलेल्या नौरोजी उद्यानातील माधवजी पॉइंटच्या दर्शनी भागात मातीच्या परीक्षणासाठी उत्खनन सुरू केले आहे.रोप-वेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे या पर्यटनस्थळाला आणखी चालना मिळणार आहे. रोप-वेने एका वेळेस ८० पर्यटक ये-जा करू शकतात. आशिया खंडातील हा सर्वात मोठा रोप-वे बनणार असून, याची लांबी १७०० मीटर आणि उंची अडीच हजार फूट आहे. कर्जत-भूतिवली-गार्बट पठार मार्गे माधवजी पॉइंटपर्यंतच्या या दहा ते पंधरा मिनिटांच्या प्रवासात पर्यटकांना विविध पॉइंट्स आणि निसर्गसौंदर्याने नटलेले माथेरान न्याहाळत गाठता येणार आहे.टाटा समूह रोप-वे बनवण्यासाठी माथेरान नगरपालिकेची आणि वनविभागाची जागा व्यापणार आहेत. यामध्ये अनेक झाडांची कत्तल होणार आहे. त्याचप्रमाणे हेरिटेज असलेले माधवजी उद्यानातील बहुतांश जागा रोप-वे मधून उतरल्यावर पर्यटकांना वापरावी लागणार आहे. त्यामुळे उद्यानात फिरावयास आलेल्या अन्य पर्यटकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.>माधवजी पॉइंट येथे छोटे स्टॉल्स लावून आम्ही पाच - सहा जण व्यवसाय करीत आहोत. यावर आमच्या कुटुंबाची गुजराण होत आहे. आमच्या स्टॉल्सच्या जागेवर हा प्रकल्प उभा राहणार असून त्यामुळे आम्ही बेरोजगार होऊ. नगरपालिकेने तसेच रोप-वेच्या समूहाने काहीतरी पर्यायी रोजगाराची अथवा प्रकल्पात काम देण्याची व्यवस्था करावी.- मयूर कदम,स्टॉल्सधारक, माथेरान>माथेरानचा विकासात्मकदृष्ट्या रोप-वे हा स्वागतार्ह प्रकल्प आहे; परंतु प्रकल्पात प्रामुख्याने स्थानिक बेरोजगारांना काम देण्यासाठी प्राधान्य मिळाले पाहिजे. रोप-वेमुळे पर्यटकांची संख्या वाढणार असून, रोजगारात भर पडणार आहे. व्यवसाय वृद्धिंगत होऊन आपोआपच पर्यटनक्र ांती घडेल.- प्रेरणा प्रसाद सावंत, नगराध्यक्षा, माथेरान
माथेरान रोप-वेच्या माती परीक्षणासाठी उत्खनन, आशिया खंडातील सर्वात मोठा रोप-वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 2:29 AM