अलिबाग : गौरी-गणपती विसर्जनानंतर भक्तांच्या परतीच्या प्रवासात कोणताच अडथळा येऊ नये, यासाठी रायगडच्या वाहतूक विभागाने तब्बल ३५० कर्मचारी मुंबई-गोवामहामार्गावर तैनात केले आहेत. गणेशभक्तांना वाहतूककोंडीचा कोणताच त्रास होणार नाही, याची पुरेशी खबरदारी घेतली असल्याचे वाहतूक विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी सांगितले.बाप्पाच्या आगमनाला काही प्रमाणात खड्ड्यांचे विघ्न असले, तरी कोणत्याही प्रकारची वाहतूककोंडी होऊन भक्तांच्या प्रवासाचा खोळंबा झाला, असे झाले नाही. वाहतूक पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे गणेशभक्तांना वेळेवर त्यांच्या घरी जाऊन सण साजरा करता आला आहे. त्यांच्या परतीच्या प्रवासात कोणताच अडथळा येऊ नये, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. पेण, वडखळ, कोलाड, इंदापूर, माणगाव, महाड, पोलादपूर या ठिकाणच्या बाजारपेठेत गर्दीच्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध डिव्हायडर लावून एकेरी वाहतूक सुरू ठेवली होती. त्यामुळे वाहतूककोंडीचा त्रास या वेळी प्रवाशांना जाणवला नाही. तशीच वाहतूक २३ सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवली असल्याचे वराडे यांनी सांगितले.पाच दिवसांचे गणपती विसर्जन झाल्यानंतर कोकणातून ठाणे, मुंबई, पुण्याकडे परतणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबई-गोवामहामार्गावर पोलिसांनी विशेष खबरदारी घेत महत्त्वाच्या ठिकाणी ६ उपविभागीय पोलीस अधिकारी, १६ पोलीस निरीक्षक, २४ सह. पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, २९७ पोलीस कर्मचारी, तसेच पोलीसस्थानकांतर्गत स्थानिक स्तरावर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.दहा दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर गणेशभक्त मुंबई-पुण्याकडे परतणार असल्याने रस्ता मोकळा करण्यासाठी विशेष मोहीम वाहतूक विभागाने हाती घेतली आहे.वाहतूककोंडी होऊ नये, याकरिता माणगावमधून काढण्यात आलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा, तसेच गणेशभक्तांनी नियमांचे पालन करून वाहने चालविण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांकडून देण्यात येत आहेत.महामार्गावर ठिकठिकाणी, सूचना फलक लावण्यात आले असून सीसीटीव्हीचा वॉचही ठेवण्यात येत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चोख वाहतूक व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 4:58 AM