जिवंत देखावे ठरताहेत विशेष आकर्षण

By admin | Published: January 23, 2016 03:13 AM2016-01-23T03:13:50+5:302016-01-23T03:13:50+5:30

किल्ले रायगडावर आयोजित करण्यात आलेल्या रायगड महोत्सवाला शुक्रवारी दुसऱ्या दिवशी पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला

Exclusive attraction of living scenes | जिवंत देखावे ठरताहेत विशेष आकर्षण

जिवंत देखावे ठरताहेत विशेष आकर्षण

Next

महाड : किल्ले रायगडावर आयोजित करण्यात आलेल्या रायगड महोत्सवाला शुक्रवारी दुसऱ्या दिवशी पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पाचाड येथे उभारलेले वाहनतळे, पूर्ण पॅक झाले असून, वाहनपार्र्किंगसाठी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी पोलीस यंत्रणेची धावपळ सुरू आहे. शनिवारी आणि रविवार सुटीचे दिवस असल्याने या दोन दिवसांत पर्यटकांची मोठ्या प्रमाणवर गर्दी उसळणार असल्याचे संकेत मिळत आहे. गडावर जाण्यासाठी रोप वेला चार तास पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागत असल्याने नाइलाजास्तव या पर्यटकांना चित्रदरवाजामार्गे पायी पायऱ्याच्या मार्गाने जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येत आहे.
२१ ते २४ जानेवारीदरम्यान राज्य शासनाच्या सांस्कृतिक खात्यातर्फे या रायगड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे गुरु वारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित उद्घाटन झाले. त्यानंतर सायंकाळपासून रायगड महोत्सव पाहण्यासाठी पर्यटकाची गर्दी होत आहे. रायगड आणि गडाच्या पायथ्याशी असलेले पाचाड हे गाव शिवमय झाले आहे. कलादिग्दर्शिक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून पाचाड परिसरात जिजामाता वाड्याजवळ भव्य शिवसृष्टी उभारण्यात आली असून, या शिवसृष्टीद्वारे शिवकालीन जीवनशैली अनुभवण्याचा योग पर्यटकांना लाभत आहे. या परिसरात उभारलेल्या स्टॉलमध्ये खवय्याची चांगली सोय झाली आहे. गुरु वारी पहिल्या दिवशी रात्री डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेले शिवचरित्रावरील भगवा ही नाट्यकृती सादर झाली. या महोत्सवात दांडपट्टा, लाठीकाठी या मर्दानी खेळांसह आदिवासी नृत्य व पारंपरिक लोककलांचे दर्शनही स्थानिक कलाकारांकडून होत आहे.
रायगडावरील राज्याभिषेकाचा जिवंत देखावा हे या महोत्सवाचे खास आकर्षक ठरत आहे. राप वेने चढून वर गेले की वासुदेव, शाहीर, पोतराज यांचे दर्शन होत आहे. राण्यांच्या महालात बसलेल्या जिजाऊ, त्यांच्याशी चर्चा करणारे मोरोपंत, राण्यांचा थाट, अष्टप्रधान महालात चाललेला त्यावेळचा कारभार पाहत समोर आले की जिजाऊंची कला लक्ष वेधून घेते. पालखी दरवाजातून खाली उतरले की, गंगासागर तलावाजवळ सप्त मनोऱ्यालगत आदिवासींचे मनोरे नृत्यू सुरू असते. त्यापुढे सांगली येथील धनगराचे गोफनृत्य सुुरू आहे. होळीच्या माळावर ढोलपथकाच्या दणाणणाऱ्या आवाजाने स्वागत होते.बिरवाडी : किल्ले रायगडावर तसेच पाचाड येथे सुरू असलेल्या रायगड महोत्सवाकरिता महाड आगारातून जादा बस गाड्या सोडण्यात आल्या आहेत. रायगड महोत्सवासाठी राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांची त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याकरिता चांगली सोय व्हावी, म्हणून महाड आगाराकडून जादा बससेवा सुरू करण्यात आली आहे. २१ ते २४ जानेवारीपर्यंत जादा बससेवा किल्ले रायगड महोत्सवासाठी महाड ते पाचाड व नातेखिंड ते पाचाड अशा सोडण्यात येणार आहेत. महाड ते पाचाड तिकीट दर २५ रुपये, नातेखिंड ते पाचाड तिकीट दर २२ रुपये असेल. विशेष म्हणजे कोकण रेल्वेच्या वीर रेल्वे स्थानक ते पाचाड अशी थेट बससेवाही सुरू करण्यात आली आहे. वीर रेल्वे स्टेशन ते पाचाड तिकीट दर ४४ रुपये आहे.

Web Title: Exclusive attraction of living scenes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.