- अजय परचुरे
पनवेल : रसायनी इथल्या पाताळगंगा परिसरात असलेल्या हिंदुस्थान आॅर्गेनिक केमिकल(एचओसी) कंपनीतून मोठ्या प्रमाणात वायुगळती झाली . या घटनेमुळे ३४ माकडं मृत्युमुखी पडली आहेत. तर १४ पक्षी गतप्राण झाले. मात्र, मृत्युमुखी पडलेल्या माकडांचा हिंदुस्थान आॅर्गेनिक केमिकल कंपनीच्या अधिका-यांनी कोणालाही थांगपत्ता न लागू देता विल्हेवाट लावली. या घटनेचा सुगावा लागताच लोकमतने हा प्रकार सर्वांसमोर उघड केला. यानंतर वनविभागाच्या अधिका-यांना जाग आली आणि त्यांनी तात्काळ हालचाल करत या घटनेची दखल घेतली. त्यामुळे ही अतिशय धक्कादायक घटना जगासमोर आली. माणुसकीला काळीमा फासणा-या या एचओसी कंपनीच्या कर्मचा-यांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी प्राणीप्रेमी संघटनांनी केली आहे.
१३ डिसेंबरला म्हणजेच बुधवारी रात्री ९ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास या कंपनीच्या इंधनाच्या टाकीतून ही वायुगळती सुरू झाली. या वायुगळतीचा आजूबाजूच्या परिसरातील असंख्य पशू-पक्ष्यांना फटका बसला. तसेच या वायुगळतीमुळे कंपनीतले दोन वॉचमनही बेशुद्ध झाले होते. त्यानंतर कंपनी बंद करण्यात आली . आणि मृत्यमुखी पडलेल्या सर्व प्राण्यांना आणि पक्ष्यांचे मृतदेह जेसीबीच्या मदतीने मोठा खड्डा करून प्लँटमध्येच पुरण्यात आले. याबद्दल कंपनीच्या अधिका-यांनी वनअधिका-यांशी कोणताही संपर्क न साधता परस्पर हा निर्णय घेतला. हा सर्व प्रकार 'लोकमत'ने उघडकीस आणला. त्यानंतर वनविभागाने या घटनेबाबत तपास सुरू केला. वनविभागाच्या अधिका-यांनी ज्या ठिकाणी या प्राण्यांना आणि पक्ष्यांना पुरण्यात आले त्या ठिकाणी जाऊन या प्राण्यांचे मृतदेह बाहेर काढले. यात वनअधिका-यांना ३४ माकडं आणि १४ पक्षी (ज्यात कबुतर,पारवा) या पक्ष्यांचा समावेश आहे. वनअधिका-यांनी तात्काळ पशुवैद्यकिय अधिकाºयांच्या मदतीने या सर्व मृत प्राण्यांचा पंचनामा करून घेतला. यानंतर या सर्व प्राण्यांना त्याच ठिकाणी जाळण्यात आले आहे. वनअधिका-यांनी याबाबत एचओसी कंपनीच्या कर्मचा-यांची चौकशी सुरू केली असून यामध्ये ज्या ज्या अधिका-यांची आणि कर्मचा-यांची चूक आहे यावर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वनअधिका-यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, रसायनीच्या जवळपास कर्नाळा अभयारण्य असल्याने या वायुगळतीमुळे वन्यजीवांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. या घटनेनेमुळे प्राणी मित्रांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.हिंदुस्थान आॅर्गेनिक केमिकल कंपनी ही इस्रोसाठी इंधन निर्मितीचे काम करते. आणि काही दिवसांतच एचओसी कंपनीकडून इस्त्रोला हा राहिलेला एकमेव प्लँटही स्थंलातरित करण्यात येणार आहे. मात्र या घटनेमुळे येथील प्राण्यांच्या अस्तित्वालाच मोठा धोका निर्माण झाला आहे.प्लँटमध्ये बाळगण्यात येणारी सावधानता कंपनीकडून न पाळण्यात आल्यामुळेच प्राण्यांचे हकनाक बळी गेले अशी प्रतिक्रिया वनशक्तीचे प्रकल्प संचालक डी.स्टॅलिन यांनी लोकमतशी बोलताना दिली. कंपनीतील अधिका-यांनी हे प्रकरण हाताळताना दाखवलेला प्रचंड हलगर्जीपणा प्राण्यांच्या जीवावर बेतला आहे. दरम्यान वायुगळतीच्या भितीने रसायनी आणि आसपासच्या परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं असून कंपनीच्या गेटवर स्थानिकांची प्रचंड गर्दी जमा होत आहे. स्थानिक पोलिसांचा प्रचंड फौजफाटा कंपनीच्या गेटवर तैनात करण्यात आला असून त्यांच्या मदतीने वनअधिकारी अधिक तपास करीत आहेत.