- राकेश खराडे
मोहोपाडा : चौक भिलवले गावाजवळ लघु-पाटबंधारे विभागाचे भिलवले धरण आहे. धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने पाण्याच्या प्रवाहावर आलेल्या मगरी स्थानिक ग्रामस्थांनी पाहिल्या. यातील एक मगर मृतावस्थेत सापडली तर दोन मगरींना पकडण्यात स्थानिकांसह वनविभागाला यश आले आहे. या मगरी आल्या कुठून याबाबत परिसरात चर्चेला उधाण आले आहे. भिलवले धरणात मगरीचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. याबाबत खालापूर पोलिसांनी या धरणात मगरीचा वावर असल्यामुळे पाण्यामध्ये उतरू नये, असा सूचना फलक लावून सावधानतेचा इशारा दिला आहे.
भिलवले धरणाच्या काठावर धनिकांचे बंगले आहेत. धरणाजवळच भिलवले गाव, ठाकूरवाडी, भिलवले आदिवासीवाडी आहे. या धरणावर पाणी योजना आहेत. येथील स्थानिक महिला कपडे धुणे, मासेमारी करणे, जनावरांना पाणी पिण्यासाठी आणणे, शिवाय खासगी बोटही चालविली जाते; परंतु धरण परिसरात मगरी आढळून आल्याने या मगरी आल्या कुठून, असा प्रश्न स्थानिकांसह वनविभागाला पडला आहे. सध्या दोन जिवंत व एक मृतावस्थेत मगर सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
भिलवले येथील स्थानिक ग्रामस्थ काम आटपून गावात जाताना त्यांना धरणाच्या खालच्या बाजूला मगर दिसली. याअगोदर पुलाच्या वरच्या भागात मृत मगर आढळली, तर बुधवार, १० जुलै रोजी दुपारच्या सुमारास आणखी एक मगर आढळली असून, ती पकडण्यात यश आले आहे. गावचे पोलीसपाटील अनंता पाटील यांनी पोलीस यंत्रणेला व वनविभागाला माहिती देऊन सांगितले. मगर नदीकाठावर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पकडून पिंजऱ्यात ठेवण्यात आली. यानंतर वनविभागाचे अधिकारी तिला खालापूर तालुक्याच्या ठिकाणी घेऊन गेले. मगर आली कुठून यासाठी वनविभागाचे अधिकारी शोध घेत आहेत. तर त्यांना स्थानिक आदिवासी तरुण वेळोवेळी मदत करीत आहेत. शिवाय पोलीस यंत्रणेनेही भिलवले धरणकाठावर सुरक्षा फलक लावले आहे. या ठिकाणांहून जाताना ग्रामस्थांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांनी केले आहे.
भिलवले धरणात मगरीचा वावर असल्याचे स्पष्ट झाले असून या धरणातून बाहेर किती मगरी पडल्या आहेत याचा शोध सुरू आहे. या धरणाच्या पाण्यात आणखी मगरी असल्याचे स्थानिक ग्रामस्थ सांगत आहेत.
भिलवले धरणात मगरींचा वावर असल्याचे स्पष्ट झाले असून आमच्या ग्रामपंचायतीनेही गावात दवंडी पिटली आहे. आतापर्यंत आम्हाला एक मृत व दोन जिवंत चार ते पाच किलोच्या मगरी सापडल्या असून त्या वनविभागाच्या ताब्यात दिल्या आहेत.- अनंता पाटील,भिलवले पोलीस पाटील