वडखळ : उन्हाचा तडाखा वाढल्याने मसाला बनविण्यासाठी महिलांची लगबग सुरू झाली आहे. पेण, वडखळ, बाजारपेठेत मसाल्याच्या मिरच्या आणि गरम मसाला घेण्यासाठी महिलांची गर्दी वाढत आहे.
मसाल्यासाठी कर्नाटकहून येणारी बेडगी, काश्मिरी तसेच आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशमधून येणारी गुंटूर आणि महाराष्ट्रातील तेजा मिरचीबरोबर आंध्र प्रदेशमधून येणाऱ्या रेशमपट्टी मिरचीलाही मोठी मागणी आहे. महाराष्ट्रातील लोक जास्त प्रमाणात बेगडी, काश्मिरी आणि तेजा मिरचीचा वापर करतात. आगरी , कोळींकडून तिखट मिरचीला तर गुजराती वर्गाकडून कमी तिखट असलेल्या रेशमपट्टीला मोठी मागणी आहे.
सध्या बाजारात सर्वसाधारणपणे मिरचीचे दर १६० ते ३७० रुपये किलो असे आहेत. गेल्यावर्षी हे भाव १३० ते ३२० रुपये किलो होते. त्यामुळे यंदा मिरच्या खरेदी करण्यासाठी खिशाला चाट बसणार आहे. बेडगी मिरची २७० रुपये किलो, घाटी मिरची १६० रुपये किलो, शंकेश्र्वरी मिरची २५० रुपये किलो, काश्मिरी मिरची ३७० रुपये किलो, हळद १६० रुपये किलो, धने १६० रुपये किलो. मसाला करण्यासाठी मिरचीबरोबर गरम मसाल्याचीही मोठी मागणी असते. वर्षभराचा विचार करता गरम मसाल्याचे दरही वाढले आहेत. दालचिनी २१० रुपये किलो, चक्रीफुल २०० रुपये किलो, लवंग ६९० रुपये किलो, काळीमिरि ५७० रुपये किलो, नागकेशर ८५० रुपये किलो, जवादी १३५० रुपये किलो, रामपत्री ६४० रुपये किलो, वेलची १८०० किलो, त्रिफळा १९० रुपये किलो, जायफळ ६७० रुपये किलो , जिरे १७० रुपये किलो, धने १५० ते २०० रुपये किलो, तेजपान ९० रुपये किलो, शाजीरे ५३० रुपये किलो, हळद १२० ते १७० रुपये किलो. मसाल्याबरोबर अख्खी हळकुंड घेवून त्याची पावडर करुन आहारात वापरतात.
घाऊक बाजारात मिरची व मसाल्याच्या पदार्थाचे भाव वाढले आहेत. तसेच वाहतुकीचा खर्चही वाढल्याने किरकोळ बाजारात मिरच्यांचे भाव वाढले आहेत. परंतु, हे भाव स्थिर राहणार असून अजून भाव वाढण्याची शक्यता कमी आहे.- राजेंद्र पाटील, व्यापारी
मसाला रोजच्या आहारातील अविभाज्य घटक असल्याने त्याचे वापरातील प्रमाण कमी -जास्त करता येत नाही. त्यामुळे भाववाढ झाली तरी ते खरेदी करावेच लागतात.- कविता पाटील, गृहणी