प्रयोगशील शाळा : संगणक साक्षरतेचा ध्यास घेणारी शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:51 AM2020-02-17T00:51:29+5:302020-02-17T00:51:44+5:30

वेश्वी येथे जिल्हा परिषद शाळेत शिकवताना विविध प्रयोग

Experimental School: A school that pursues computer literacy | प्रयोगशील शाळा : संगणक साक्षरतेचा ध्यास घेणारी शाळा

प्रयोगशील शाळा : संगणक साक्षरतेचा ध्यास घेणारी शाळा

googlenewsNext

निखिल म्हात्रे

अलिबाग : सध्या खासगी शाळांच्या स्पर्धेत आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेने आपल्या शाळा डिजिटल करण्यावर भर दिला आहे. विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करून त्यांना स्पर्धेत कायम कसे ठेवता येईल, याचा ध्यासच जणू जिल्हा परिषदेने घेतला आहे. अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील जिल्हा परिषदेची शाळा डिजिटल करतानाच सुसज्ज इमारत, खेळासाठी क्रीडांगण, निसर्गाच्या सानिध्यातील वातावरण आणि विद्यार्थ्यांना शिकवताना विविध प्रयोग करण्याचा प्रयत्न शाळेचे वेगळेपण दर्शवतो.

अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथे जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असणाऱ्या शाळेला तब्बल ६५ वर्षांचा कालावधी झालेला आहे. शाळेने अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले आहे. सर्वांना शिक्षणाचा अधिकार यानुसार शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक बदल होत आहेत. दर्जेदार शिक्षणासाठी एक सक्षम पर्याय निर्माण होण्यासाठी अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दोन वर्षांपूर्वी डिजिटल कक्षाची स्थापना करण्यात आली होती. खासगी शिक्षण संस्थांशी स्पर्धा करत असताना जिल्हा परिषद आणि नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे. या हेतूने जिल्हा परिषदेची शाळा अद्ययावत करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान देताना संगणकाचा वापर करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होत असल्याचे मुख्याध्यापक अश्विनी लांगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

गावातील मुलांना शिक्षणासाठी अवश्यक असलेल्या प्राथमिक व मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी गावाची प्रथम नागरिक म्हणून मी नेहमीच आग्रही असते. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या डिजिटल कक्षाचा शिक्षणासाठी योग्य वापर करीत विद्यार्थ्यांमध्ये याची आवड निर्माण व्हावी, हाच या मागचा उद्देश आहे.
- आरती पाटील, सरपंच

विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी उपक्रम
जिल्हास्तरीय स्पर्धेत या शाळेच्या विद्यार्थ्यांनी विषेश प्रावीण्यही मिळविले आहे.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी वेश्वी येथील जिल्हा परिषेच्या शाळेचे शिक्षक विविध उपक्रम राबवित आहेत.

समाजातील विविध घटकांकडून मदत
शाळेत शिक्षण घेणारे आज मोठ्या हुद्द्यावर आहेत. त्यांच्याकडून तसेच समाजातील विविध घटकांकडून मदतीचा हातही देण्यात येत असल्याने विशेष अडचणींचा सामाना करावा लागत नाही.

संगणकावर दृक-श्राव्य माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे आकलन करण्यास सहज आणि सोपे जात असल्याचे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचे म्हणणे आहे.
- अश्विनी लांगे, मुख्याध्यापक

वाचन, सरावाची क्षमता वाढण्यास मदत
शाळेत सुरू असलेल्या डिजिटल कक्षाबरोबरच विद्यार्थ्यांना अभ्यासाची अधिक रुची निर्माण व्हावी, यासाठी शाळांच्या भिंतीवर शाळेत जाणारी मुले, पुस्तक वाचणारी परी, हिरवळीने नटलेला शाळेचा परिसर, स्वच्छतेचे देण्यात आलेले संदेश, अशी विविध चित्रे रेखाटण्यात आली आहेत. त्यामुळे दिवसभर शाळेत मुले रममाण होऊन जातात. त्यांच्यात वाचनाची, सराव करण्याची क्षमता वाढण्यास मदत होत आहे.

खासगी शाळांमध्ये संगणकाच्या माध्यमातून ज्ञान दिले जाते. आता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अशी सुविधा निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगली बाब आहे, असे इयत्ता सातवीमध्ये शिकणारी सोनाली पातवान हिने सांगितले. चित्रांच्या माध्यमातून आकलन सहज आणि सोप्या पद्धतीने होऊन लक्षात राहण्यात मदत मिळते, असेही सोनालीने सांगितले.


 

Web Title: Experimental School: A school that pursues computer literacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.