पेण: पीओपी बंदीबाबत गणेशमूर्तिकारांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर शुक्रवारी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी बैठक घेत मूर्तिकारांबरोबर चर्चा केली. यानंतर 'पीओपी'बाबत तज्ज्ञांचा शास्त्रीय अहवाल केंद्र सरकारला पाठविणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
गेल्या महिन्यात राज्यातील गणेशमूर्तिकारांनी पेण येथे एकत्र येऊन पीओपी बंदीविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यावेळी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंढे यांची भेट घेऊन मार्ग काढण्याचा प्रस्ताव पेणचे आमदार रवींद्र पाटील यांनी मांडला होता. त्यानुसार शुक्रवारी मंत्रालयात त्यांच्या दालनात पेणमधील गणेशमूर्तिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार रवींद्र पाटील, गणेशमूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष अभय म्हात्रे, नितीन मोकल, कैलास पाटील, कुणाल पाटील व इतर गणेशमूर्तिकार उपस्थित होते. यावेळी मूर्तिकारांनी या बंदीमुळे ओढवणारे संकट त्यांच्यासमोर मांडले.