धाटाव : भाजपाच्या राज्य सरकारने यावर्षीच्या अर्थसंकल्पात सामान्य जनतेला दिलासा द्यायच्या ऐवजी अंगणवाडी, आरोग्यसेवा, शिक्षण, रेशन, पेन्शन यासारख्या महत्त्वाच्या योजनांवर कुऱ्हाड चालवली जात आहे. राज्य सरकारचे हे बजेट सामान्य जनतेसाठी नाही. म्हणून महाराष्ट्रभर अर्थसंकल्पाचा जोरदार निषेध म्हणून गुरुवारी रोह्यात सर्वहारा जनआंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत शोषित जनआंदोलन केले. या आंदोलनात सबंध रोहे शहरासह ग्रामीण भागातील आंदोलनकर्त्यांनी सहभाग घेतला होता. गुरुवारी दुपारी १२ नंतर आंदोलनकर्त्यांनी आपला मोर्चा तहसील कार्यालयावर नेला. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांच्यासमवेत अनेक कार्यकर्ते, महिलांनी जोरदार घोषणा दिल्या. २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात पोषण, आरोग्यसेवा, रेशन, शिक्षण, पेन्शन यासारख्या सामाजिक सेवांवर सरकारची कुऱ्हाड आल्याचे दिसून आले. यामध्ये मुलांच्या पोषणासाठीची तरतूद ६२ टक्के कमी केली आहे. ग्रामीण आरोग्य अभियानाचे ३५ टक्के, सर्व शिक्षा अभियानाला ५६ टक्के कमी तर अन्न सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुरेसा निधी नाही, पेन्शनची मागणी करणाऱ्या असंघटित कामगारांच्या, शेतमजुरांच्या पदरी निराशाच अशा अनेक सेवांवर कपात आणल्याचे निवेदनात म्हटले आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार ऊर्मिला पाटील यांना देण्यात आले.
रोह्यात सर्वहाराचे शोषित जनआंदोलन
By admin | Published: April 01, 2016 3:08 AM