महाडच्या कंपनीत स्फोट; १३ कामगार जखमी, सात किलोमीटरवरील शहर हादरले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 12:35 PM2023-02-09T12:35:41+5:302023-02-09T12:36:05+5:30
महाड औद्योगिक वसाहतीमध्ये पिग्मेन्ट रंगाची निर्मिती करणारा मल्लक हा कारखाना आहे.
महाड : औद्योगिक क्षेत्रातील मल्लक या कारखान्याला बुधवारी सकाळी अचानक आग लागून मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे संपूर्ण औद्योगिक क्षेत्रासह सात किलोमीटरवर असलेले महाड शहरही हादरले. कारखान्यातील इमारतीचे अवशेष, लोखंडी तुकडे जवळपास दोन किमी अंतरावर जाऊन पडले. आठ किमीच्या परिसराला दणके बसले, इतकी स्फोटाची तीव्रता होती. आग विझविण्याचे काम सुरू असतानाच हा स्फोट झाल्याने या कंपनीतील, तसेच शेजारील काही कंपन्यांमधील एकूण तेरा जण जखमी झाले आहेत.
महाड औद्योगिक वसाहतीमध्ये पिग्मेन्ट रंगाची निर्मिती करणारा मल्लक हा कारखाना आहे. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास कारखान्यात आग लागली. आगीने कंपनीचा एका प्लांटला क्षणातच विळखा घातला. आग लागल्याचे समजताच कंपनीच्या कामगारांनी आगीवर नियंत्रण आणण्याचे आटोकाट प्रयत्न केले; मात्र त्याचवेळेस प्लांटमधील एका रिॲक्टरने पेट घेऊन त्याचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे महाड औद्योगिक परिसर चांगलाच हादरला.
स्फोटाच्या दणक्याने कंपनीच्या प्लांटची इमारत पूर्णपणे ढासळून गेली. या ढासळलेल्या इमारतीचे अवशेष परिसरात जाऊन पडले. कंपनी परिसरात असलेल्या प्रीव्ही, श्रीहरी आणि सिद्धार्थ या कंपन्यांच्या खिडक्या मोडून पडल्या, तर रिॲक्टरसह अन्य लोखंडी तुकडे सुमारे दोन किमी अंतरापर्यंत उडाले. स्फोट झाल्याने आग अधिकच भडकली. कंपनीच्या दोन प्लांटला आगीने विळखा दिला. यामुळे आकाशात धुराचे लोट दिसत होते. आग लागताच कंपनीतील कामगारांनी कंपनी बाहेर धाव घेत सुरक्षित स्थळ गाठले. आग विझविण्यासाठी मेहनत घेणारे कामगार आणि महाड नगरपालिका, महाड औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाने प्लांटचा ताबा घेतला. मात्र, याचवेळी स्फोट झाल्याने आग विझविणारे कामगार आणि परिसरातील कंपन्यांतील कामगारांनीदेखील कंपनीबाहेर पळ काढला.
या धावपळीत कंपनीच्या सुरक्षा विभागाचे कामगार आणि शेजारील कंपन्यांमधील निशांत जाधव, भावेश बकालिया, अजित पासवान, शत्रघून पासवान, नितीन पाटील, संतोष जाधव, मोहन देशमुख, राजेश तिवारी, सत्य रंजन पतरू, संदेश घरत, सुनील काटे, अरुण दाते आणि रमाधीसु असे १३ जण यामध्ये जखमी झाले. या सर्वांवर महाड उत्पादक संघटनेच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.
दोन तासांनंतर आग नियंत्रणात -
आग विझविण्यासाठी महाड नगरपालिका, महाड औद्योगिक विकास महामंडळाचे अग्निशमन दल, लक्ष्मी कारखान्याचे अग्निशमन दल यांच्यासह खेड, रोह, नागोठणे, पेण, माणगाव या ठिकाणांहून अग्निशमण दल घटनास्थळी दाखल झाले. दोन तासांनंतर आग नियंत्रणात आणली. मात्र, ज्या ठिकाणी आग लागली त्याठिकाणी घातक रसायनांचा साठा आणि प्लांट असल्याने अग्निशमन दलाव्यतिरिक्त अन्य व्यक्तींना प्रवेश निषिद्ध करण्यात आला. या ठिकाणी इथाईल ऑक्साईडचा प्लांट आहे. या प्लांटचे तापमान वाढू लागल्याने कंपनी प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला.