खोपोलीतील इंडिया स्टील कंपनीत स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 06:30 AM2019-04-15T06:30:30+5:302019-04-15T06:30:34+5:30
खोपोली शहरात इंडिया स्टील वर्कस् लिमिटेड या कंपनीत रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास अचानक स्फोट झाला.
खोपोली : खोपोली शहरात इंडिया स्टील वर्कस् लिमिटेड या कंपनीत रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास अचानक स्फोट झाला. क्षणार्धात कंपनीच्या आवारात आगीचा लोट पसरला. त्यामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र, कंपनीचे मोठे नुकसान झाले. हा स्फोट एवढा भीषण होता की खोपोली शहराच्या अनेक भागांत स्फोटाचे हादरे जाणवले.
खोपोलीतील मेल्टिंग शॉप परिसरातील इंडिया स्टील वर्कस् लिमिटेड या कंपनीत कच्च्या मालावर प्रक्रि या करून त्याचे रूपांतर पक्क्या स्टीलमध्ये करण्याची प्रक्रिया कंपनीत रविवारीही नेहमीप्रमाणे सुरू होती. याचदरम्यान दुपारी तीनच्या सुमारास अचानक भट्टीला भोक पडले आणि त्यातून स्टीलचा तप्त रस खाली असलेल्या भागात पडल्याने अचानक आगीचा भडका उडून स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की, संपूर्ण शहराला हादरे बसले. खोपोली नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. हिंदुस्थान पेट्रोकेमिकल कंपनीचे जवान आणि सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते, स्थानिक रहिवासी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले. साधारणपणे दीड तासात आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले.
खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक के. एस. हेगाजे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार, संदीप येडेपाटील, पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग किसवे, पोलीस कर्मचारी प्रदीप कुंभार, गडदे यांनी सुरक्षेची जबाबदारी सांभाळत कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून एकंदर परिस्थिती पाहता मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले दिसत आहे. कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरात या घटनेमुळे नुकसान झाले आहे का याचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
>सुरक्षा यंत्रणेचा अभाव
इंडिया स्टील वर्कस् लिमिटेड या कंपनीत वारंवार अशा घटना घडत आहेत. तरीही याकडे इंडस्ट्रीयल सेफ्टी आणि हेल्थ डिपार्टमेंटचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. जीवितहानी घडल्यानंतरच ही यंत्रणा जागी होणार का, असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या कंपनीत सुरक्षा यंत्रणा सुस्थितीत नव्हती. आग विझविण्याची सयंत्रे निकामी होती हे निदर्शनास आले आहे. कंपनीचे कर्मचारी आग लागल्यावर काही वेळ मदतीला होते. मात्र नंतर तेथे कोणीच अधिकारी, कर्मचारी उपलब्ध न झाल्याने आढावा घेणे पोलीस यंत्रणेला कठीण जात होते.