लोखंडी गर्डर बसविण्यासाठी द्रुतगती महामार्ग अडीच तास बंद
By वैभव गायकर | Published: April 10, 2024 05:27 PM2024-04-10T17:27:48+5:302024-04-10T17:28:33+5:30
गर्डर बसविण्याच्या कामासाठी दि.10 रोजी दुपारी 12 ते 3 दरम्यान वाहतुक बंद ठेवल्याने जुन्या मुंबई मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
पनवेल: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे महामार्ग पोलिस केंद्र पळस्पे यांच्या हद्दीत 07.560 किमी चिखले ब्रीज या ठिकाणी पनवेल कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय रेल्वे कॉरीडोरच्या लोखंडी गर्डर बसविण्याच्या कामासाठी दि.10 रोजी दुपारी 12 ते 3 दरम्यान वाहतुक बंद ठेवल्याने जुन्या मुंबई मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
काही वाहन चालकांना याबाबत कोणतीच पूर्वकल्पना नसल्याने सायन पनवेल महामार्ग,मुंबई पुणे मार्ग तसेच पळस्पे फाट्यावर वाहनांची प्रचंड कोंडी झाली होती.कळंबोली याठिकाणी बॅरिकेटिंग करून द्रुतगती महामार्गावरील वाहतुक कळंबोली सर्कल वरून डी पॉईंट ,करंजाडे ,पळस्पे मार्गे जुना मुंबई पुणे महामार्गाने पुणे बाजुकडे वळविण्यात आली होती.तसेच राष्ट्रीय मार्ग क्रमांक 48 अर्थातच जुने मुंबई पुणे महामार्गाने येणारी सर्व प्रकारची वाहने कोनब्रिज येथून मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून पुणे बाजुकडे वळविण्यात आलेली होती.या कामांमुळे वाहतूक पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.
वाहतुक नियमनासाठी 40 कर्मचारी
द्रुतगती महामार्गावर हाती घेतलेल्या कामासाठी 3 तास वाहतुकीत बदल करण्यात आले होते.या कामासाठी 30 वाहतुक पोलीस आणि 10 वार्डन ची नेमणुक करण्यात आली होती.कळंबोली पासुन 1.5 किमी,5.5 किमी,कोन फाटा आदी ठिकाणावर हे कर्मचारी नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश बुरकु. यांनी दिली.
पोलीस उपनिरीक्षक,महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे गणेश बुरकुल म्हणाले की, तीन तासांसाठी हाती घेतलेले काम अडीच तासातच मार्गी लागले.यादरम्यान महत्वाच्या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते.