तरतूद नसतानाही वाळू विक्रीला मुदतवाढ
By admin | Published: October 10, 2016 03:36 AM2016-10-10T03:36:15+5:302016-10-10T03:36:15+5:30
सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ पाण्याबाहेर राहिलेली वाळू मातीमध्ये रूपांतर होते. अशी माती झालेली वाळू बांधकाम व्यावसायिक घेत नाहीत.
सिकंदर अनवारे / दासगाव
सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ पाण्याबाहेर राहिलेली वाळू मातीमध्ये रूपांतर होते. अशी माती झालेली वाळू बांधकाम व्यावसायिक घेत नाहीत. किंबहुना साठवणुकीच्या या वाळूला बाजारपेठेत किंमत मिळत नाही. असे असताना दोन वर्षांपूर्वी बंद काळात जप्त केलेल्या वाळूचा महाड महसूल प्रशासनाकडून काढलेल्या लिलावावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ठेका संपल्यानंतर कोणत्याही बाबीची तरतूद नसताना हा ठेका घेतलेल्या वाळू व्यावसायिकांना १० दिवस विक्रीसाठी मुदतवाढ करून दिल्याने महसूल विभाग तसेच गौण खनिकरण विभाग यांच्यावर देखील संशय व्यक्त करण्यात येत आहे.
महाडमधून वाहणाऱ्या सावित्री नदी आणि खाडीतून जानेवारी २०१६ मध्ये वाळू उत्खनन परवाना पारस हातपाटी संघटना, सागर श्रमिक हातपाटी संघटना, फै सल चांदले, शौकत इसाने अशा चार व्यावसायिकांनी घेतला होता. सर्व ठेक्यांची मुदत सप्टेंबर महिन्याच्या शेवटी संपली. पर्यायाने वाळू वाहतूक आणि विक्रीसाठी देण्यात आलेले परवाने रद्द झाले. वास्तविक पाहता उत्खनन बंदी लागू झाल्यापासून शासनाच्या महसूल विभागाने आणि पोलीस प्रशासनाने महाडमध्ये होणाऱ्या अनधिकृत वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर कारवाईचे धाडसत्र सुरू करणे अपेक्षित होते. मात्र तसे कोणतेही चित्र सध्या महाडमध्ये दिसून येत नाही. उलटपक्षी महाडमधील बांधकाम व्यावसायिकांच्या साईटवर वाळूचे ढीग टाकले जात आहेत. याकडे कोणीही अधिकारी पाहण्यास तयार नाही. चोरीच्या होणाऱ्या वाळू वाहतूक व उत्खननावर कारवाई करण्याऐवजी अनधिकृत धंद्यांना पाठीशी घालण्याचे काम केले जात आहे.
दोन वर्षांपूर्वी महाडच्या खाडीमध्ये ५ हजार ९७७ ब्रास चोरीची वाळू महसूल प्रशासनाकडून पकडण्यात आली होती. या वाळूचा लिलाव २०१४ पासून दोन वेळा करण्यात आला. मात्र एकावेळी एका व्यावसायिकाने काही प्रमाणात घेतला मात्र तोही वाळू बंदीच्या काळात दुसऱ्या वेळी या लिलावाला कोणीही हात घातला नाही. गेल्या महिन्यात महाड प्रांताधिकारी त्यांनी जप्त केलेल्या वाळूचा लिलाव काढला. वाळू बंदीच्या काळात हा लिलाव काढल्याने एका व्यावसायिकाने तो ताबडतोब उचलला. सध्या महाड तालुक्यातील विशाल महाडिक यांनी ८१६ ब्रासचा लाल वाळूचा लिलाव घेतला आहे. या परवान्याची विक्री मुदत ३० नोव्हेंबर २०१६ आहे. ही वाळू लालसर असल्याने या वाळूचा वापर बांधकामासाठी होणार नाही. अशा परिस्थितीत वाळू व्यावसायिक या वाळूच्या लिलावाखाली नवीन वाळूचा धंदा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या ज्या प्लॉटचे लिलाव करण्यात आलेले आहे, मात्र त्या प्लॉटवर वाळूच नसल्याची चर्चा नागरिकांकडून करण्यात येत आहे. तरी पुन्हा दिलेल्या प्लॉटची फेरतपासणी करण्याची मागणी प्रशासनाकडे नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच बंद वाळूच्या काळात हा लिलाव काढण्यात आल्याने वाळू व्यावसायिक तसेच महसूल अधिकारी यांचे संगनमत असल्याची चर्चा करण्यात येत आहे.