कर्जत : पुणे - मुंबई सिंहगड या एक्स्प्रेस गाडीचा ठाणे रेल्वे स्थानकावर ‘आॅपरेशनल थांबा’ ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आला असल्याचे लेखी उत्तर मध्य रेल्वे प्रशासनाने दिले आहे. प्रत्येक तीन महिन्याला या थांब्याला मुदतवाढ मिळत आहे. त्यापेक्षा या गाडीला अधिकृत थांबा देण्याची मागणी प्रवासीवर्गातून होत आहे. सिंहगड एक्स्प्रेस ही गाडी मुंबईहून पुण्याला जाताना ठाणे येथे थांबते; परंतु ही गाडी पुण्याहून मुंबईला येताना ठाणे रेल्वे स्थानकात थांबत नाही. गेल्या वर्षी या गाडीचा पुण्याहून मुंबईला जाताना ठाणे रेल्वे स्थानकावर ३० जून, २०१६पर्यंत ‘आॅपरेशनल थांबा’ देण्यात आला होता व तो नंतर ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आला. त्यानंतर त्याला पुन्हा ३१ डिसेंबर, २०१६पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता ही गाडी पुण्याहून मुंबईकडे येताना ठाण्यात थांबेल का, असा प्रश्न प्रवाशांना पडला होता. याबाबत कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे पंकज मांगीलाल ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाशी पत्र व्यवहार केले असता रेल्वे प्रशासनाचे अधिकारी बिमल रॉय यांनी हा आॅपरेशनल थांबा ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आल्याचे लेखी कळवले.- गेल्या वर्षभरात तीनदा या थांब्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. पहिले सहा महिने केवळ एकाच मिनिटासाठी असलेला थांबा आता दोन मिनिटे करण्यात आला आहे. मात्र, या गाडीला ठाण्यात कायमस्वरुपी थांबा मिळावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
ठाण्यातील सिंहगडच्या आॅपरेशनल थांब्याला मुदतवाढ
By admin | Published: January 08, 2017 2:47 AM