चाकरमान्यांसाठी रोहा आगारातून जादा बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 01:03 AM2020-08-14T01:03:03+5:302020-08-14T01:03:12+5:30
एसटीसाठी ई-पासची आवश्यकता नाही; सॅनिटायझर, तोंडाला मास्क लावणे बंधनकारक
रोहा : कोकणात आलेल्या चाकरमान्यांना त्यांच्या परतीच्या प्रवासाकरिता मुंबई, बोरीवली, नालासोपारा व ठाणे या मार्गावर शुक्रवार २८ आॅगस्ट ते रविवारी ३० आॅगस्ट या कालावधीत रायगड परिवहनच्या रोहा आगारामार्फत एस.टी. बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक सोनाली कांबळे यांनी दिली.
चाकरमान्यांसाठी काही मार्गांवर सोडण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये रोहा आगारातून रोहा ते बोरीवली ही गाडी सकाळी १० व दुपारी २ वाजता सोडण्यात येईल. रोहा ते मुंबई दुपारी १ वाजता, रोहा ते ठाणे सकाळी ९ वाजता, तळा ते नालासोपारा सकाळी ८ व दुपारी २ वाजता, तळा ते मुंबई दुपारी १ वाजता, तळा-इंदापूर-बोरीवली दुपारी १२ वाजता, तळा-रोहा-बोरीवली ३ वाजता, कोलाड ते मुंबई दुपारी २.३० वाजता, कोलाड ते बोरीवली दुपारी २.३० वाजता अशा प्रमाणे बसेस रोहा आगारातून सुटणार आहेत.
कोरोना नियमांचे पालन बंधनकारक
एसटी प्रवासादरम्यान एसटी प्रवासाकरिता ई-पासची आवश्यकता राहणार नाही, एका बसमध्ये फक्त २२ प्रवासी असतील, तसेच ग्रुप बुकिंगकरिता २२ प्रवासी आवश्यक असतील, प्रवासात सर्व प्रवाशांना कोरोनाविषयक नियमांचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे,
महत्त्वाचे म्हणजे प्रवाशांनी सोबत सॅनिटायझर व तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांनी त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था स्वत: करायची आहे. अशा नियम व अटींचे पालन करणे बंधनकारक असल्याच्या सूचना रोहा आगारामार्फत देण्यात आल्या आहेत.
प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून रोहा आगाराने या विशेष जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. या गाड्यांचे नियोजन गौरी-गणपती विसर्जनाच्या दुसºया दिवसापासून करण्यात आले आहे. मुदतवाढ झाल्यास तसे रोहा आगाराकडून वेळोवेळी सूचित करण्यात येईल. तरी वरील मार्गावर प्रवास करणाºया प्रवाशांनी एसटी बसने प्रवास करून आपला प्रवास सुखकर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.