अतिरिक्त एमआयडीसीत सांडपाणी वाहिनी फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 01:19 AM2018-05-31T01:19:35+5:302018-05-31T01:19:35+5:30
महाड औद्योगिक वसाहतीमधील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचे सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी तीन ठिकाणी फुटल्याचे निदर्शनास आले
महाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचे सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी तीन ठिकाणी फुटल्याचे निदर्शनास आले. हे सांडपाणी कोप्रान कंपनीतून बाहेर पडत असल्याचा संशय परिसरातील ग्रामस्थांना आल्याने संतप्त ग्रामस्थांच्या जमावाने या कारखान्याच्या एका अधिकाऱ्याला धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला.
गेल्या तीन चार दिवसांपासून कोप्रान कंपनीच्या बाहेर सांडपाणी बाहेर येत असल्याचे निदर्शनास येत होते. शनिवारी देखील या प्रकरणी संतप्त ग्रमस्थांनी या कारखान्याबाहेर जमून नाराजी व्यक्त केली होती. बुधवारी या प्रकारात वाढ झाल्यानंतर मात्र ग्रामस्थांचा संयम सुटला आणि त्यांनी पुन्हा या कारखान्याकडे धाव घेतली. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे स.पो.निरिक्षक आबासाहेब पाटील यांनी देखील या कारखान्याकडे धाव घेवून जमावाची समजूत काढून त्यांना पांगविले. मात्र तत्पूर्वीच या जमावाच्या रागाचा फटका या कारखान्याच्या एका अधिकाºयाला बसला.
स.पो.निरिक्षक पाटील यांनी कोप्रानच्या व्यवस्थापनाला हे बाहेर आलेले सांडपाणी उपसून टाकण्याची सूचना केली. हे काम करत असतानाच औद्योगिक विकास महामंडळाची सांडपाणी वाहून नेणारी मुख्य वाहिनी तीन ठिकाणी फुटल्याचे आणि त्यातूनच ही गळती होत असल्याचे निदर्शनास आले. हा सर्व प्रकार घडत असताना एमआयडीसीचा एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी फिरकला नव्हता. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी माने आणि क्षेत्र अधिकारी वसावा आणि ताटे यांनी घटनास्थळावरून सांडपाण्याचे नमुने घेतले आहेत.
एमआयडीसीची सांडपाणी वाहिनी फुटली आहे, याबाबत पत्रव्यवहार आम्ही एमआयडीसीकडे केला होता मात्र त्याची दखल घेतली नाही असा दावा कोप्रानचे महाव्यवस्थापक सक्सेना यांनी पत्रकारांशी बोलताना केला.