जिल्ह्यात सर्वत्र सप्तरंगांची उधळण
By admin | Published: March 14, 2017 02:18 AM2017-03-14T02:18:22+5:302017-03-14T02:18:22+5:30
जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकमेकांवर सप्तरंगांची उधळण करून धुळवड धूमधडाक्यात साजरी करण्यात आली. तरुणांसह आबालवृध्दही रंगोत्सवामध्ये
अलिबाग : जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकमेकांवर सप्तरंगांची उधळण करून धुळवड धूमधडाक्यात साजरी करण्यात आली. तरुणांसह आबालवृध्दही रंगोत्सवामध्ये चांगलेच न्हाऊन निघाल्याने जणू इंद्रधनुष्य समुद्रकिनारी अवतरल्याचे चित्र पहायला मिळाले. सकाळपासूनच प्रमुख बाजारपेठा, भाजी मंडई काही अंशी बंद असल्याने चौकाचौकामध्ये ढोल-ताशांच्या गजरात रंगोत्सव साजरा करण्यात आला.
शिमगोत्सव म्हणजेच होळीचा सण संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी धुळवड साजरी केली जाते. सकाळपासूनच रस्त्यांवर तरुणाईचा घोळका एकत्र येऊन रंगोत्सव साजरा करीत होते. काहींनी चौकाचौकांमध्ये डीजे लावला होता, तर काही ठिकाणी बँजो, ढोल- ताशाच्या गजरावर ठेका धरला होता. सप्तरंगांच्या रंगात तरुणाई मंत्रमुग्ध झाली होती.
तोंड रंगविलेल्या बाइकस्वारांसह चारचाकी वाहनातून जथ्थेच्या जथ्थे रस्त्यांवरून फिरत होते. चौकाचौकात रंगोत्सव साजरा केल्यावर समुद्र किनाऱ्याकडे गर्दी सरकत होती. समुद्र स्नानाचा आनंद घेताना तेथे काही पर्यटकही तरुणाईच्या रंगात रंगून जात असल्याचे दिसून आले.
समुद्र किनारी मोठ्या संख्येने स्थानिकांसह पर्यटक दाखल झाल्याने तेथे जत्रेचे स्वरूप आले होते. तरुणींसह महिलांनीही रंगोत्सव साजरा केला. मुलांच्या ग्रुपप्रमाणेच तरुणी आणि महिलांचेही ग्रुप रस्त्यावर धुळवड साजरी करताना ठिकठिकाणी दिसत होते. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत उत्सव साजरा करण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)
कर्जत : तालुक्यात ३७९ होळ्या पेटविण्यात आल्या असून धूलिवंदन शांततेत साजरे करण्यात आले. पाणी वाचविण्यासाठी बहुतांश ठिकाणी कोरडेच धूलिवंदन पाहायला मिळाले.
कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत खासगी ४५ व सार्वजनिक १४६, नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत खासगी ४० व सार्वजनिक १३५, माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीत खासगी ३ व सार्वजनिक १० अशा एकूण ३७९ होळ्या पेटविण्यात आल्या. पाण्याचा गैरवापर टाळण्यासाठी कर्जत शहरात सकाळऐवजी दुपारी पाणीपुरवठा करण्यात आला होता.
गावागावातील लहान मुलांनी दहा दिवस आधीच होळीची पिल्ले पेटवून होलिकोत्सव जवळ आल्याची चाहूल दिली होती. दोन- तीन दिवस आधी सुकलेल्या झाडांच्या फांद्या गोळा करण्यात आल्या.
होळीच्या दिवशी सावरीचे झाड मधोमध उभे करून त्याभोवती लाकडे, झाडांच्या फांद्या, पेंढ्या टाकून होळी रचण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांनी होळीची पूजा करून रात्री होलिका दहन करण्यात आले. धुळवडीच्या दिवशी लहानग्यांनी रंगांची उधळण करीत धुळवड साजरी केली. रस्त्यावरील वाहनांना अडवून होळीचे पोस्त जमा करण्यासाठी बालगोपाळांबरोबरच तरुणही पुढाकार घेत होते.
मुरु ड समुद्रकिनारी हजारो पर्यटक
च्आगरदांडा : कोकणात लोकप्र्रिय असलेला होलिकोत्सव पारंपरिक पध्दतीने साजरा करण्यात आला. या वेळी केळी, साखर, आंबा, नारळ, सुपारीच्या फांद्यांचे पूजन करण्यात आले. जवळच्या वाडीत जाऊन होळी आणून ती सजविणे यात बच्चे कंपनीने पुढाकार घेतला होता. प्रत्येक गावाच्या, प्रथेप्रमाणे होलिकोत्सव साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. राग, द्वेष, मत्सर होळीत जाळून टाकावा हा या उत्सवातील एक हेतू मानला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी करण्यात आली.
च्सोमवारी सकाळपासूनच रस्ते, नाके गजबजले होते. वाहनाची रेलचेलही तुरळक होती. प्रत्येकाच्या हातात रंग, गुलाल, पिचकाऱ्या दिसत होत्या. उत्तर भारतीय समाजाकडून मुरु ड समुद्राजवळ होळी मिलन समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये मुरु ड शहरातील नगरसेवक प्रमोद भायदे, नगरसेवक अशोक धुमाळ व मान्यवर तसेच पर्यटकांनी हजेरी लावली व नृत्याचा ठेका घेतला.
उरण परिसरात होलिकोत्सव, धुळवड उत्साहात
उरण : उरण परिसरात रविवारी संध्याकाळपासूनच होलिकोत्सवाची धूम सुरू होती. होळी पूजनानंतर मध्यरात्री ठिकठिकाणी पारंपरिक हाकाटी देत नागरिकांनी होळी साजरी केली. सोमवारी उरण परिसरात धुळवडही नागरिकांनी अनेक रंगांची उधळण करीत साजरी केली. धुळवडीनंतर हजारो नागरिकांनी पीरवाडी, माणकेश्वर, दांडा समुद्र किनाऱ्यावर पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी गर्दी केली होती. पीरवाडी, माणकेश्वर, दांडा येथील बीचवरील गर्दीमुळे समुद्रकिनारेही फुलून गेले होते.