रायगड: जिल्ह्यासाठी पुढील चार दिवस अतिदक्षतेचे ठरणार आहेत. या कालावधीत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. सोसाट्याचा वारा वाहणार असल्याने समुद्र लगतच्या सर्व तालुक्यांना दक्ष राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
जून महिन्यात आलेल्या निर्सग चक्रीवादळाच्या आठवणी अद्याप ताज्या असतानाच पुन्हा एका नैसर्गिक आपत्तीच्या इशाऱ्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता सर्तक राहावे आणि जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन केले आहे.13/10/2020 ते 17/10/2020 यां कालावधीत राज्यात विजेच्या कडाकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना सर्तक राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्या अनुशंगाने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सर्तक राहण्याचे आदेश दिले आहेत.
विशेषतः किनारपट्टी लगतच्या सर्व जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या कालवाधीत समुद्र खवळलेला असल्याने मच्छिमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये, अतिवृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, विजांचा कडकडाटासह वादळी वारा वाहणार असल्याने मोकळ्या जागेत उभे राहू नये, विजेचे खांब, लोखंडी वस्तू विद्युत वस्तूपासून दूर रहावे, सुखे अन्न पदार्थ, बॅटरी, पुरेस औषधे, पिण्यासाठी पाणी अन्य व्यवस्था करण्यात यावी, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.