वर्षभरात १५६ जणांनी केले नेत्रदान
By admin | Published: June 10, 2017 01:16 AM2017-06-10T01:16:32+5:302017-06-10T01:16:32+5:30
‘नेत्रदान हेच श्रेष्ठ दान’ हा सामाजिक दृष्टीचा सद्विचार स्वेच्छेने स्वीकारून रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात १५६ व्यक्तींनी
जयंत धुळप ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : ‘नेत्रदान हेच श्रेष्ठ दान’ हा सामाजिक दृष्टीचा सद्विचार स्वेच्छेने स्वीकारून रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात १५६ व्यक्तींनी केलेले मृत्यूपश्चातील नेत्रदान हे अनन्य साधारण दान ठरले आहे. या नेत्रदात्यांच्या माध्यमातून तब्बल १२० दृष्टिहीनांना जिल्ह्यात दृष्टी प्राप्त झाली आहे. सरकारी आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून चार, तर पनवेल येथील लक्ष्मी आय बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यात एकूण १५६ नेत्रदात्यांचे तब्बल ३१२ नेत्रगोल संकलित झाले. त्यातील डोळ्यांच्या बाहुलीच्या पडद्याचे रोपण केल्यावर तब्बल १२० दृष्टिहीनांना दृष्टी प्राप्त झाल्याची माहिती रायगड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी दिली आहे.
मृत्यूपश्चात त्या व्यक्तीच्या घरी तत्काळ पोहोचणे, त्यांचे नेत्रगोल घेणे आणि ते पनवेलमधील लक्ष्मी आय बँकेत पोहोचवणे. त्यानंतर नेत्रहीन व्यक्तीवर नेत्ररोपणाची शस्त्रक्रिया करून त्यास दृष्टी प्राप्त करून देणे, ही सारी प्रक्रिया सोपी नाही. या प्रक्रियेकरिता रायगडच्या महाड व पोलादपूर तालुक्यांच्या ग्रामीण भागात स्वेच्छेने आणि कोणत्याही आर्थिक मोबदल्याच्या अपेक्षेविना स्वखर्चाने आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कार्यरत सेवाभावी डॉक्टरांचे योगदान महत्त्वपूर्ण असेच आहे.
लक्ष्मी आय बँकेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन महाड येथील ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. सुजाता दाभाडकर यांच्या नेतृत्वाखाली महाड येथील डॉ. चंद्रशेखर दाभाडकर, सामाजिक कार्यकर्ते दाम्पत्य मोहन व कांचन शेठ, पोलादपूर येथील डॉ. नितीन मपारा, डॉ. संजय शेठ, डॉ. समीर साळुंखे, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. राजा सलागरे, सामाजिक कार्यकर्ते शैलेश तलाठी व सुलोचना कडाले यांनी सात वर्षांपूर्वी २०११मध्ये महाड व पोलादपूर या दुर्गम तालुक्यांत नेत्रदानविषयक जनजागृतीचे काम सुरू केले. २२ आॅगस्ट २०११ रोजी महाड येथील वसंत शहा यांच्या निधनानंतर त्यांच्या व त्यांच्या नातेवाइकांच्या इच्छेनुसार पहिल्या मरणोत्तर नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात या सर्व डॉक्टर चमूला यश आले आणि ग्रामीण भागातील नेत्रदान चळवळीस एक नवी दिशा प्राप्त झाली.
गेल्या सात वर्षांत महाड व पोलादपूर तालुक्यांतील दिवील, सडवली, काटेतळी, पितळवाडी, गंजावणे, पार्ले, लोहारे, तुर्बाडे आदी सुमारे २० गावांतून तब्बल ११८ व्यक्तींचे मृत्यूपश्चात नेत्र संकलित करून २३६ नेत्रगोल लक्ष्मी आय बँकेत जमा करण्याची कामगिरी या डॉक्टर चमूने केली आहे. या संकलित २३६ नेत्रगोलांच्या माध्यमातून किमान ७०० नेत्रहीनांना दृष्टी प्राप्त होऊ शकली आहे.
परदेशात विविध रुग्णालयांत होणाऱ्या मृत्यूनंतर नेत्रदान करण्याबाबत त्या रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये जाणीव जागृती करण्यात येते. तेथील कायदेशीर तरतुदीनुसार बेवारस मृत्यूअंती नेत्रदान करून घेतले जाते.
आपल्या देशात याबाबत आवश्यक कायद्यांत सुधारणा झाल्यास त्या माध्यमातूनदेखील भारतात मोठ्या प्रमाणात दृष्टिहीनांकरिता नेत्रगोल उपलब्ध होऊ शकतील, असा विश्वास डॉ. अभिषेक होशिंग यांनी अखेरीस व्यक्त केला आहे.