‘मरिना’चा मार्ग सुकर, सिडकोचा सकारात्मक निर्णय, नाममात्र दरात भूखंड उपलब्ध करून देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 06:30 AM2017-09-14T06:30:25+5:302017-09-14T06:30:40+5:30

बेलापूर येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या मरिना प्रकल्पाचा मार्ग आता सुकर झाला आहे. या प्रकल्पाला आवश्यक असणारी जमीन सिडकोने नाममात्र दरात मेरीटाइम बोर्डाला देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे शहराच्या लौकिकात भर घालणारा हा प्रकल्प लवकरच आकारास येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 By facilitating the 'marina', the CIDCO's positive decision, making the plot available at nominal rates | ‘मरिना’चा मार्ग सुकर, सिडकोचा सकारात्मक निर्णय, नाममात्र दरात भूखंड उपलब्ध करून देणार

‘मरिना’चा मार्ग सुकर, सिडकोचा सकारात्मक निर्णय, नाममात्र दरात भूखंड उपलब्ध करून देणार

googlenewsNext

- कमलाकर कांबळ
नवी मुंबई : बेलापूर येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या मरिना प्रकल्पाचा मार्ग आता सुकर झाला आहे. या प्रकल्पाला आवश्यक असणारी जमीन सिडकोने नाममात्र दरात मेरीटाइम बोर्डाला देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे शहराच्या लौकिकात भर घालणारा हा प्रकल्प लवकरच आकारास येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोचीनंतर देशातील हा दुसरा प्रकल्प असल्याने त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
बेलापूर सेक्टर १५ येथे खाडी किनाºयांवर सुमारे सात एकर जागेवर हा प्रकल्प साकारला जाणार आहे. मेरीटाइम बोर्डाच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाला लागणारी जमीन नाममात्र दराने मेरीटाइम बोर्डाला देण्यास सिडकोने तयारी दर्शविली आहे. विशेष म्हणजे मरिना प्रकल्पासाठी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे या सातत्याने पाठपुरावा करीत आहे. त्यानुसार सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी तीन वर्षांपूर्वी या प्रकल्पाची अधिकृत घोषणा केली होती. हा संपूर्ण प्रकल्प मेरीटाइम बोर्डाच्या माध्यमातून उभारला जाणार आहे. त्यामुळे प्रस्तावित प्रकल्पाची जमीन मेरीटाइम बोर्डाला हस्तांतरित करणे आवश्यक होते. सुरुवातीच्या काळात सिडकोने या जमिनीसाठी आठ कोटी रुपयांची मागणी केली होती. परंतु इतकी मोठी रक्कम देणे शक्य नसल्याचे मेरीटाइम बोर्डाने सिडकोला कळविले होते. त्यामुळे हा प्रकल्प रखडला होता. आमदार मंदा म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर मेरीटाइम बोर्डाने अलीकडेच सिडकोला पत्र पाठवून प्रस्तावित प्रकल्पाची जमीन नाममात्र दराने उपलब्ध करण्याची विनंती केली होती. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी ही विनंती मान्य करीत मरिना प्रकल्पासाठी नाममात्र दरात जमीन हस्तांतरित करण्यास अनुकूलता दर्शविली आहे. संचालक मंडळाच्या आगामी बैठकीत याबाबतचा ठराव मंजूर केला जाणार असल्याची माहिती भूषण गगराणी यांनी ‘लोकमत’ला दिली. सिडकोच्या सकारात्मक भूमिकेमुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरणाºया मरिना प्रकल्पाचा मार्ग सुकर झाला आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये
1स्थानिक रहिवाशांच्या गरजा आणि अपेक्षा लक्षात घेऊन या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे.
2येथील वॉटर फ्रंडचा परिसर सुमारे १.८ किमीचा असून तो चार भागात विभागला गेला आहे. यातील एका भागात मरिना, उद्यान, वॉटर रिक्रिएशन, फूड प्लाझा, स्केटिंग रिंग व खेळण्यासाठी मैदान असणार आहे.
3दुसºया भागात खारफुटीचा परिसर असून तिसºया भागात दिवाळे गाव तर चौथ्या भागात प्रामोनेडचा समावेश असणार आहे.

 या चारही भागांना जोडण्यासाठी वॉटर फ्रंड वॉकवे तयार करण्याची योजना आहे. या प्रकल्पाला भेट देणाºया पर्यटकांना छोट्या बोटिंगच्या सफारीचा आनंदही लुटता येणार आहे.

मरिना प्रकल्पासाठी आवश्यक असलेली जमीन नाममात्र दराने उपलब्ध करावी, अशी मेरीटाइम बोर्डाची विनंती होती. त्यासंदर्भात अलीकडेच त्यांचे एक पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार एक रुपयाच्या नाममात्र भाडेकराराने ही जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर करून प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केली जाईल.
- भूषण गगराणी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

मरिना प्रकल्पासाठी तीन वर्षांपासून संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरू होता. मेरीटाइम बोर्ड आणि सिडकोने यासंदर्भात घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे हा प्रकल्प आता दृष्टिपथात आला आहे. मरिना प्रकल्पाच्या माध्यमातून नवी मुंबईत एक दर्जेदार पर्यटन स्थळ उभारले जाणार आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच महापालिकेच्या उत्पन्नात त्यामुळे भर पडणार आहे.
- मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर

सध्या कोची येथे एक मरिना प्रकल्प आहे. त्यानंतर बेलापूर येथे दुसरा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. सेंट्रल पार्क, गोल्फ कोर्स, अर्बन हाट, उत्सव चौक तसेच नवी मुंबईचा ज्वेल नेकलेस म्हणून ओळखला जाणाºया पामबीच मार्गामुळे शहराचा लौकिक वाढला आहे. यात आता मरिना प्रकल्पाची भर पडणार आहे.

Web Title:  By facilitating the 'marina', the CIDCO's positive decision, making the plot available at nominal rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.