मध्य रेल्वेच्या लौजी स्थानकात सुविधांची वानवा
By admin | Published: February 23, 2017 06:13 AM2017-02-23T06:13:04+5:302017-02-23T06:13:04+5:30
मध्य रेल्वेने मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून थेट खोपोलीस उपनगरीय सेवा सुरू करून
मोहोपाडा : मध्य रेल्वेने मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून थेट खोपोलीस उपनगरीय सेवा सुरू करून तब्बल १६ वर्षांचा कालखंड उलटला असला, तरी या मार्गावरील लौजी, डोलवली, केळवली व पळसदरी या स्थानकांची अवस्था बिकटच आहे. या रेल्वेस्थानकांवर मूलभूत सुविधांची वानवा आहे, तसेच फलाटावर झाडे-झुडपे वाढली असून, याचा प्रवाशांना त्रास होत आहे. येथील झाडांची, गवताची कापणी करून फलाट स्वच्छ करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
फलाटांवर वाढलेली झुडपे, प्रवाशांना बसण्याची गैरसोय, अपुरी प्रकाश व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची कमतरता, स्वच्छतागृहांचा नुसताच देखावा, फलाटावरील निवारा शेडची कमतरता, परिणामी, ऊन- वारा -पाऊस या तिन्ही हंगामाचा प्रवाशांना करावा लागणारा सामना, तसेच परतीच्या प्रवासाची व पहिल्या वर्गाची तिकिटे न मिळणे, अशा समस्या या मार्गावरील प्रवाशांना सतावत आहेत. तर ६० वर्षांपूर्वी चार पत्र्यांची उभारलेली शेड अद्याप पडक्या अवस्थेत उभी असून त्यामध्ये होणारी घाण व झुडपे यामुळे प्रवाशांंना त्रास होत आहे. मुंबई-पुणे बोरघाट-कर्जत-लोणावळा असा थेट प्रवास सुरू होण्याअगोदर खोपोलीतून प्रवास होत असे. खोपोली रेल्वे १९०२ मध्ये सुरू झाली. मात्र, जुनी रेल्वेसेवा असूनही रेल्वे प्रशासन या मार्गावरील प्रवाशांंना सुविधा देण्यास अद्याप कमी पडत असल्याचे चित्र रेल्वेस्थानकांवरील फलाटांवर पाहावयास मिळत आहेत.
केळवली, डोलवली, पळसदरी स्थानकांची दुर्दशा
च्खोपोलीचे प्रवेशद्वार म्हणून व नवीन खोपोली म्हणून उदयास येणाऱ्या लौजी स्थानकात गवत व झाडे-झुडपे पाहून हेच रेल्वेचे स्थानक आहे का? असा प्रश्न रेल्वेप्रवासी करीत आहेत. तर याहीपेक्षा बिकट अवस्था केळवली, डोलवली व पळसदरी रेल्वेस्थानकांची आहे.
च्मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी कर्जत, नेरळ रेल्वेस्थानकांना भेटी देऊन स्थानकांची पाहणी केली. त्यादरम्यान ही स्थानके स्वच्छ व चकचकीत करण्यात आली होती. मात्र, कर्जतच्या पुढील पळसदरी, केळवली, डोलवली व लौजी ही स्थानके अद्यापही जंगली झुडपात हरवलेली असून, असुविधांचे माहेरघर ठरत आहेत.
च्केळवली, डोलवली व लौजी या स्थानकांत रेल्वेचा एकही कर्मचारी नाही, अशी स्थानके भारतीय रेल्वेच्या सेवेतील एकमेव स्थानके असावीत आणि तीही भारतीय रेल्वेने अभिमानाने मिरवणाऱ्या व रेल्वेचा उगम असणाऱ्या मुंबईपासून फक्त ११० कि.मी. अंतरावर असणाऱ्या मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेतील खोपोली मार्गावरील लौजी, डोलवली व केळवली ही स्थानके आहेत.