मुरुड : २०२० व २१ या वर्षापासून वादळी वारे, अवकाळी पाऊस व त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनमुळे स्थानिक मच्छिमार पुरते हैराण झाले आहेत. सततच्या संकटांमुळे रायगड जिल्ह्यातील कोळी समाज पूर्णतः हवालदिल झाला आहे. तरी अशा बिकट परिस्थितीचा सामना करीत शासनाच्या मदतीची कोणतीही अपेक्षा न ठेवता संस्कृती जपत पारंपरिक होळी (शिमगा) सण आनंदाने साजरा करताना दिसत आहेत.
होळी सण हा जणू कोळी समाजाचा आवडता सण असून, सर्वात प्रथम होड्यांना रंगीबेरंगी पट्ट्याने सजवून, त्याला झूल झालर, वेगवेगळ्या रंगांचे झेंडे तसेच होडीच्या शेंड्याला भारतीय ध्वज मोठ्या डौलाने डुलत असून, आम्ही भारतीय आहोत, हे अभिमानाने सांगत असतात. तसेच होडीच्या किनाऱ्यास आकर्षक फुलांची माळ सजवल्याने होड्यांच्या सौंदर्यात अधिक भर पडते.
रायगड जिल्ह्यातील असंख्य कोळी बांधव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. खोल समुद्रातून मासेमारी झाल्यावर ही मंडळी मुंबई येथील ससून डॉक (कुलाबा मार्केट) येथे मिळालेली सर्व मासळी विकून आपल्या घरी परतत असताना, खंदेरीच्या वेताळ देवाचे दर्शन घेऊनच घरी परततात; तर यातील काहीजण गावाकडून स्वतःच्या बोटीनेसुद्धा वेताळ देवाच्या दर्शनाला येत असतात अशी माहिती एकविरा व कमलावती या होड्यांचे मालक चंद्रकांत बाबू सरपाटील यांनी दिली.
दहा हजारपेक्षा जास्त होड्या येतात किनारीरायगड जिल्ह्यामधील सुमारे दहा हजारपेक्षा जास्त होड्या होळी सण साजरा करण्यासाठी सागरी किनाऱ्याला येत असून, हा सण मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात. मुंबईहून आलेली होडी व त्यावर काम करणारे १५ ते १६ जण गावात परतून आपल्या नातेवाईक व मित्रांमध्ये रममाण होत असतात. किमान दहा ते बारा दिवस गावात वस्ती करून होळी साजरी करून या बोटी पुन्हा मुंबईकडे रवाना होत असतात. मोठ्या आनंदात होळी सण हा कोळी समाजातर्फे दरवर्षी साजरा केला जातो, असे तांडेल संदीप डाकी यांनी सांगितले.