खरसईत माकडाने बालिकेला पळवले
By admin | Published: May 14, 2017 10:53 PM2017-05-14T22:53:51+5:302017-05-14T22:53:51+5:30
गेली कित्येक वर्षे माकडांनी शहराशी जवळीक साधली असून घराघरात हैदोस घातला आहे. त्यातून खुद्द म्हसळा शहराचीही सुटका झाली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसळा : गेली कित्येक वर्षे माकडांनी शहराशी जवळीक साधली असून घराघरात हैदोस घातला आहे. त्यातून खुद्द म्हसळा शहराचीही सुटका झाली नाही. अगदी घरातील डबेही उचलून नेण्याचा प्रकार वारंवार म्हसळ्यात घडत आहे. नुकताच म्हसळा तालुक्यातील खरसई येथे माकडांनी धुमाकूळ घातलाअसून पाळण्यात झोपलेल्या दीड महिन्याच्या चिमुकलीवर हल्ला करून तिला पळवून नेण्याचा प्रकार घडला.
दीड महिन्याची चिमुकली विनंती दीपक खोत हिला तिच्या आईने दुपारी दोनच्या सुमारास पाळण्यात झोपवले आणि काही कामासाठी स्वयंपाक घरात गेली असता माकडाने पाळण्यात झोपलेल्या चिमुकलीला उचलून घराच्या माळ्यावर घेऊन गेला. माकडाने घरावरील कौलावर जाण्याचा प्रयत्न करीत असताना बालिकेच्या रडण्याचा आवाज आला असता चिमुकली का रडते हे पाहण्यासाठी तिची आई बाहेर पडली. चिमुकली पाळण्यात दिसली नाही म्हणून आई घाबरली व आरडाओरडा करू लागली आणि माळ्यावर पहायला गेली व आपली चिमुकली माकडाच्या हातात दिसली. आईने प्रसंगावधान साधून धैर्याने माकडाला हाकलून लावले व चिमुकलीची सुटका करून घेतली.
या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.