वाहतूकदारांच्या समस्या सोडविण्यात अपयश; बंदराचे कामकाज बंद पडण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2023 06:58 PM2023-10-18T18:58:07+5:302023-10-18T18:59:02+5:30
जेएनपीए अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या खासगी बीएमसीटी (सिंगापूर पोर्ट) बंदर प्रशासन कंटेनर मालाची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांच्या समस्या सोडविण्यात पुर्णता अपयशी ठरले आहे.
मधुकर ठाकूर
उरण : जेएनपीए अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या खासगी बीएमसीटी (सिंगापूर पोर्ट) बंदर प्रशासन कंटेनर मालाची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांच्या समस्या सोडविण्यात पुर्णता अपयशी ठरले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही वाहतूकदारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ २६ ऑक्टोबरपासून बंदराच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याची धमकी वजा इशारा तीनही कंटेनर वाहतूक करणाऱ्या संघटनांनी नोटीसीव्दारे दिल्याने बंदर प्रशासनामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
जेएनपीए अंतर्गत खासगीकरणातून भारत मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी) उर्फ सिंगापूर पोर्ट (पीएसए) उभारण्यात येत आहे.८००० कोटी खर्चाच्या या बंदरातुन वर्षाकाठी एक कोटी कंटेनर मालाची वाहतूक केली जाणार आहे.या बंदराचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे.दुसऱ्या टप्प्याचे काम अद्यापही रखडत रखडत सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर या खासगी बंदरातुन मोठ्या प्रमाणावर कंटेनर मालाची वाहतूक केली जात आहे. मात्र कंटेनर टर्मिनलमधुन इनआउट करण्यासाठी वाहनचालकांचा सरासरी १२ तासांचा वेळ जात आहे.यामुळे निर्यात भरलेल्या आणि रिकाम्या प्लॅटफॉर्मच्या वाहनांच्या टर्मिनलच्या दिशेने वाहतुकीच्या प्रवाहावर गेट-इन प्रक्रियेची गती मंदावली आहे.टर्मिनल ऑपरेशन कर्मचार्यांची अकार्यक्षमता आणि व्यवस्थापकीय उदासीनता यामुळे वाहतूकदारांवर गंभीर परिणाम झाला आहे.यामुळे वाहनांच्या इंधनाचा अधिऐ वापर आणि पर्यावरणीय प्रदूषणात वाढ होत चालली आहे.
दीर्घ प्रतीक्षेच्या अंतरामुळे बीएमसीटीमध्ये वाहन ब्रेकडाऊनचे प्रमाण खूप जास्त आहे.तसेच प्री-गेट पॉईंटच्या पलीकडे आणि टर्मिनलमध्ये ब्रेकडाऊन झालेल्या वाहनांच्या दूरुस्तीची प्रक्रिया अत्यंत कठीण आणि वेळखाऊ आहे.याचा थेट विपरीत परिणाम निर्यात-आयात व्यापारावर होत आहे.पोर्ट ग्राउंड भाडे, फॅक्टरी आयातीसाठी अप्रभावी इन्व्हेंटरी प्लॅनिंग आणि निर्यात बंद शुल्काच्या परिणामाला मोठ्या प्रमाणावर कंटेनर मालाची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना सामोरे जावे लागत आहे.
असोसिएशनने या समस्यांबाबत अनेक तक्रारी केल्या आहेत.या तक्रारींनंतर चर्चेच्या अनेक बैठका झाल्या आहेत .मात्र सल्लामसलत करूनही टर्मिनलने समस्या सोडवण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे वाहतूकदारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.याप्रकरणी जेएनपीएच्या हस्तक्षेपानंतरही बीएमसीटी व्यवस्थापनाच्या कामकाजात कोणत्याही प्रकारची सुधारणा अथवा कोणत्याही प्रकारची सुधारणा होण्याची चिन्हे नाहीत.
वाहतूकदारांच्या समस्यांकडे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष, बीएमसीटी प्रशासनाने अवलंबिलेले उदासीन धोरणामुळे संतप्त झालेल्या तीनही कंटेनर वाहतूक करणाऱ्या संघटनांनी २६ ऑक्टोबरपासून बीएमसीटी उर्फ सिंगापूर पोर्ट बहिष्कार टाकण्याची धमकी वजा इशारा न्हावा-शेवा कंटेनर ऑपरेटर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष सुनील मुळीक, रेफर कंटेनर ट्रान्सपोर्टर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष संजय पोतदार, न्हावा -शेवा पोर्ट स्थानिक प्रकल्पग्रस्त कंटेनर वाहतूक सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे यांनी बीएमसीटी प्रशासनाला नोटीसीव्दारे दिला आहे.
तीनही कंटेनर वाहतूक करणाऱ्या संघटनेच्या सुमारे २५ हजारांहून अधिक या बंदरात कंटेनर मालाची वाहतूक करीत आहेत.२६ ऑक्टोबरपर्यंत बीएमसीटी व्यवस्थापनाने योग्य तोडगा काढला नाही तर जेएनपीए अंतर्गत असलेल्या सर्वात मोठ्या खासगी बंदरातुन होणाऱ्या आयात-निर्यात मालाच्या वाहतुकीचे काम ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.