पोलिस भरतीत दिले बनावट प्रमाणपत्र, चौघा उमेदवारांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2023 09:46 AM2023-06-14T09:46:10+5:302023-06-14T09:46:22+5:30
सर्व कागदपत्रांची केली शहानिशा
लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: रायगड जिल्हा पोलिस दलात नुकत्याच झालेल्या कॉन्स्टेबलच्या भरतीमध्ये प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करून भरती होण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. बोगस प्रमाणपत्र सादर केलेल्या चौघा जणांना अलिबाग पोलिसांनी अटक केली असून, अशाप्रकारे आणखी पाच जणांनी फसवणूक केली असल्याचे समजते. त्यांच्या कागदपत्रांची सखोल छाननी करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
रोहित बबन मगर (वय २६), केशव गिरजाची मुरमुरे (२८ ), गोविंद सुखदेव ठाणगे (२७) व अच्युत भागवत माने अशी अटक केलेल्या युवकांची नावे आहेत. सर्वांना पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
रायगड पोलिस दलात शिपाई पदासाठी २७२ व चालकपदाच्या आठ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांसाठीच्या आरक्षित कोट्यातून अनेकांनी अर्ज केले होते. मैदानी व लेखी परीक्षेतून अंतिम निवड जाहीर करण्यात आली असून, पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करून नेमणूक करण्यात येत आहेत. दरम्यानच्या कालावधीत गडचिरोलीतील पोलिस भरतीत बोगस प्रमाणपत्र रॅकेट प्रकरणात रायगडमधील हवालदार सिद्धेश पाटील याला अटक केली.
सर्व कागदपत्रांची केली शहानिशा
रायगड जिल्हा भरतीतही अशाच पद्धतीने बनावट प्रमाणपत्र देण्यात आल्याचे शक्यतेने या कोट्यातून पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या सर्व कागदपत्रांची शहानिशा करण्यात आली. त्यातून भरतीचा हा बोगस प्रकार उघडकीस आला आहे. चौघा जणांविरोधात भारतीय दंड विधान कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. बोगस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र कोणी दिले, यासाठी किती रक्कम दिली, याबाबत पुढील तपास अलिबाग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय जाधव हे करीत आहेत.