अलिबाग : सात वर्षांपूर्वी अपघातात पतीचा मृत्यू झाल्याचा बनाव करून हत्या केल्याचे लपवलेले असताना रायगड पोलिसांनी यशस्वी तपास करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे आणि त्याच्या पथकाने सात वर्षांपूर्वी समोद महादेव शेडगे याच्या झालेल्या खुनाचा शोध लावून संदीप नामदेव कळंबे याला अटक केली आहे. मयताच्या पत्नी सोबत असलेल्या अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. रायगड पोलिसांनी अत्यंत महत्वाचा गुन्ह्याचा शोध लावून उत्तम कामगिरी केली आहे.
महाड पंढरपूर रस्त्यावर बोरगाव ते चांडवे येथे ७ ऑगस्ट २०१६ रोजी मयत समोद शेडगे हे आपल्या पत्नी सोबत मोटार सायकलवर जात असताना अज्ञात वाहनाने ठोकर दिली असून पतीला मार लागून मृत्यू झाल्याचे पत्नीने महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी भा द वी कलम ३०४ अ, २७९, ३३७ मोटार वाहन कायद्यानुसार १८४, १३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. मात्र समोद यांचा अपघाती झालेल्या मृत्यू बाबत त्याच्या आईने संशय व्यक्त केला होता. आईने राज्य मानवी हक्क आयोग तसेच न्यायालयात याचिका दखल केली होती.
मानवी हक्क आयोगाने समोद शेडगे अपघात प्रकरणात ३०२, २०१ प्रमाणे कलम वाढवून मे २०२३ रोजी जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक यांनी तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी जून महिन्यात आपल्या सहकाऱ्यांसह तपास सुरू केला. मात्र अपघात नसून ही हत्या असल्याचे पोलिसांना निष्पन्न करायचे मोठे आव्हान समोर होते. पोलिसांनी मयत याचा मोबाईल शोधून काढून आरोपी पर्यंत पोहचण्यास सुरुवात केली. सीडीआरची तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी मोबाईल आयएएम नंबर द्वारे शोध घेतला. त्यावेळी आरोपी याने मोबाईल विकल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपीची माहिती घेऊन त्यास ताब्यात घेतले.
आरोपी संदीप कळंबे रा. भिवघर महाड यास पोलिसांनी अटक केली. मयत आणि आरोपीची पत्नी यांच्यात अनैतिक सबंध होते. यातून मयत याला प्लॅन करून मारले आणि अपघात झाल्याचा बहाणा केला. मात्र सात वर्षाने पोलिसांनी या गुन्ह्याचा योग्य तपास करून समोद याच्या हत्येचा तपास लावून आरोपीला जेरबंद केले.
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे याच्या मार्गदर्शन खाली अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे, पोलीस उपनिरीक्षक विक्रांत फडतरे, महाड एम आय डी सी पोह संजय साळवी, अरुण घरत, सागर अष्टमकर, पोशि बंडगर, मपोह अभियंती मोकल या पथकाने यशस्वी गुन्ह्याची उकल केली आहे.