वरंध भोर घाटातील पडझडीमुळे पर्यटनाला खीळ; स्थानिकांचा रोजगार बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 12:34 AM2020-08-25T00:34:56+5:302020-08-25T00:35:12+5:30
पावसामुळे संरक्षक भिंत कोसळून घाट बंद ; प्रवाशांची गैरसोय
बिरवाडी : महाड-पंढरपूर राज्य मार्गावरील वरंध भोर घाटामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे संरक्षक भिंत कोसळून हा घाट प्रवासाकरिता धोकादायक बनला आहे. याचा परिणाम पर्यटनावरही होत असून त्यासोबतच स्थानिक व्यावसायिकांचा रोजगार बुडाल्याने त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
पश्चिम महाराष्ट्र व कोकणला जोडणाºया वरंध भोर घाटामुळे व्यापाराला चालना मिळण्यासोबतच पावसाळ्याच्या दिवसांत डोंगरावरून वाहणारे धबधबे व निसर्गाचा आनंद लुटण्याकरिता पर्यटक मोठ्या प्रमाणात या घाटाला पसंती देत असतात. मात्र, गेली दोन वर्षे मोबाइल टॉवरच्या केबलमुळे रायगड व पुणे जिल्ह्याला जोडणाºया या घाटामध्ये संरक्षक भिंत पडणे, दरड कोसळणे अशा घटना घडत असल्याने हा रस्ता वाहतुकीकरिता धोकादायक बनल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे गणेशोत्सवाकरिता कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये दाखल होणाºया चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे तर दुसरीकडे वरंध भोर घाटातील पुणे व रायगड जिल्ह्याच्या हद्दीलगत असणाºया वाघजाई मंदिराजवळ वडापाव, भजी विकून आपला उदरनिर्वाह करणारे राम पवार हे १९८६ पासून वरंध भोर घाटामध्ये आपला व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.
मात्र गेल्या दोन वर्षांपासून मोबाइल टॉवरच्या केबलमुळे या घाट रस्त्याची पडझड होऊन पर्यटनाच्या हंगामामध्ये घाट वाहतुकीकरिता बंद करण्यात येत असल्याने स्थानिक व्यावसायिकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे राम पवार यांनी सांगितले. पर्यटनाला चालना देण्याकरिता महाड पंढरपूर राज्य मार्गावरील वरंध भोर घाटातील पडझड थांबविण्याकरिता राज्य शासनाने विशेष पावले उचलावीत, अशी मागणी महाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेश देशमुख यांनी केली आहे.
महाड-पंढरपूर राज्य मार्गावरील वरंध भोर घाटामध्ये असणाºया सह्याद्रीच्या पर्वतरांगांना गिर्यारोहक, इतिहासप्रेमी नेहमीच पसंती देत असतात. पावसात येथील निसर्गरम्य देखावा कॅमेऱ्यांमध्ये टिपण्याकरिता तरुण पर्यटक या घाटाला नेहमीच पसंती देतात. मात्र सद्य:स्थितीत हा घाट वाहतुकीकरिता धोकादायक झाला असल्याने पर्यटनाला खीळ बसत आहे.