आश्रमशाळांच्या निकालात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 01:31 AM2019-06-14T01:31:59+5:302019-06-14T01:32:04+5:30
सरासरी निकाल ५४.४१ टक्के : पेण आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत १३ प्रशाला
पेण : दहावी शालान्त परीक्षेच्या निकालात पेण येथील आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळांच्या निकालात मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. प्रकल्पाच्या अखत्यारीतील एकूण १३ प्रशाला आहेत. या शाळांमधून ५५५ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी ३०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सरासरी टक्केवारी ५४.४१ इतकी आहे. गतवर्षीपेक्षा यंदाच्या निकालात २७ टक्क्यांनी घसरण झाली आहे. प्रशालेमधील पनवेल- साई आश्रमशाळेचा निकाल सर्वात जास्त ९४.७३ टक्के इतका लागला आहे, तर सर्वात कमी निकाल पेणमधील वरसई आश्रमशाळेचा १६.२० टक्के इतका लागला आहे.
आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत शैक्षणिक सोयी सुविधांवर लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र, शाळांचे व्यवस्थापन व शैक्षणिक गुणवत्तेत प्रगती दिसत नाही. पेणमध्ये प्रकल्प कार्यालय असतानाही शालान्त परीक्षेच्या निकालात आश्रमशाळांची शैक्षणिक प्रगती हवी तशी दिसत नाही. येथील वरसई शाळेचा निकाल १६.२० टक्के, सावरसई ३१.१४ टक्के तर वरवणे शाळेचा निकाल ३५.५५ टक्के असा निकाल घसरला आहे. या तीन शासकीय आश्रमशाळांचे मिळून एकूण १४३ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पेणमधील या तीन आश्रमशाळांचा सरासरी निकाल २६.४३ टक्के इतका लागला आहे. प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या पायरण येथील आश्रमशाळेचा निकाल ७६.४७ टक्के , सानेगाव ७४.४८ टक्के, वेरळ ६८.७५ टक्के, कादवण ६५ .२१ टक्के, भालिवाडी ६५.०० टक्के व पिंगळे शाळेचा निकाल ५६.६६ टक्के लागला आहे. याबाबत विचारणा केली असता, ज्या आश्रमशाळांचे निकाल कमी लागलेत त्या आश्रमशाळेतील शिक्षकांना आगामी वर्षातील निकालात प्रगती केली नाही तर उचलबांगडी करण्यात येईल, असे सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आश्रमशाळांची शैक्षणिक गुणवत्ता विकास वाढीसाठी आता प्रकल्प अधिकारी गजेंद्र केंद्रे यांना शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर द्यावा लागणार आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण जि. रायगड
इयत्ता दहावी निकाल (शासकीय आश्रमशाळा)
आश्रमशाळा परीक्षार्थी उत्तीर्ण विद्यार्थी निकाल
पायरज ६८ ५२ ७६.४७
भालीवडी ४० २६ ६५
वरसई ३७ ६ १६.२०
सानेगाव ३५ २६ ७४.२८
चाफेवाडी ६३ २६ ४१.२६
पिगळस ६० ३४ ५६.६६
डोलवली २४ ११ ४५.८३
साई ३८ ३६ ९४.७३
सावरसई ६१ १९ ३१.१४
वरवणे ४५ १६ ३५.५५
कोळघर २२ ९ ४०.९०
सादवण ४६ ३० ६५.२१
वेरळ १६ ११ ६८.७५
एकूण ५५५ ३०२ ५४.४२