परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतीला फटका; दक्षतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 10:43 PM2019-11-01T22:43:45+5:302019-11-01T22:44:05+5:30
महाचक्रिवादळामुळे मासेमारी करणाऱ्यांना समुद्रात जाण्यास मज्जाव
अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अलिबाग, पेण, पाली आणि रोहासह अन्य भागांमध्ये पावसाने कहर केला. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाचक्रिवादळही निर्माण झाले आहे. या महाचक्रिवादळाचा कोकण किनारपट्टीला फटका बसणार नसला तरी ८ नोव्हेंबरपर्यंत महाचक्रिवादळाची तीव्रता राहणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका हा भातशेतीला बसला आहे. महाचक्रिवादळामुळे मासेमारी करणाऱ्यांनाही मज्जाव करण्यात आला असल्याने त्यांचेही आर्थिक नुकसान होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून परतीचा पाऊस अधूनमधून बरसत असल्याने मोठ्या प्रमाणात भातशेती उद्ध्वस्त झाली आहे. दसरा आणि दिवाळीच्या कालावधीमध्ये भात कापणीला सुरुवात करण्यात येते. मात्र, याच कालावधीत परतीच्या पावसाने कहर केल्याने शेतामधील भाताचे पीक आडवे झाले. अलिबाग, पेण, रोहा, कर्जत, माणगाव या तालुक्यातील शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यानंतरही पावसाचा जोर सुरूच होता. अलिबाग, पेण, पाली आणि रोहा या ठिकाणी पावसाचा जोर अधिक असल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
सतत बदलत जाणाºया हवामानामुळे गेल्या काही दिवसांपासून समुद्रही खवळलेल्या स्थितीमध्ये आहे. त्यामुळे मासेमारी करणाºया नौकाही किनाºयावरच उभ्या आहेत. त्यामुळे मच्छीमार बांधवांना मासेमारी करण्यासाठी समुद्रामध्ये जाता न आल्याने त्यांचेही मोठे आर्थिक नुकसान होत आहे. वादळी वाºयासह बरसणाºया पावसामुळे काही ठिकाणच्या घरांचे छप्पर उडून गेले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कक्ष पुन्हा दक्ष करण्यात आला आहे. मदतीसाठी नागरिक या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
नियंत्रण कक्ष २४ तास सुरू
गेले काही दिवस पावसाने कहर केल्यामुळे भातशेतीची पुरती वाट लागली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास गेल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनामार्फत तातडीने सुरू करण्यात आले आहेत. पंचनामे झाले नसतील, तसेच पंचनाम्यामध्ये काही तक्रारी असल्यास तातडीने नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नियंत्रण कक्ष २४ तास सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले. प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
बेलाची वाडीला चक्रिवादळाचा तडाखा
कर्जत तालुक्यातील अनेक ठिकाणी रात्रीच्या सुमारास अचानक चक्रिवादळाने थैमान घालत अवघ्या काही मिनिटांत मोठमोठाले झाडे उन्मळून पडली. विजेचे लोखंडी खांब वाकून काही खांब पडले. अनेक ठिकाणी झाडे घरावर व दुकानावर पडून मोठे नुकसान झाले. तर घरावरचे छप्पर उडून सामान्य नागरिकांना याचा आर्थिक फटका बसला आहे.
कर्जत तालुक्यातील अंभेर पाडा ग्रामपंचायत हद्दीतील बेलाची वाडी परिसरात अचानक आलेल्या चक्रिवादळाने अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. तर महावितरणलाही या चक्रिवादळाचा मोठा फटका बसला. अनेक घरांची पडझड झाली असून झाडे उन्मळून घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळाच्या तडाख्यात विद्युत खांब पडल्याने परिसर दोन दिवसांपासून अंधारात आहे. तालुक्यात परतीच्या पावसाचा कहर सुरूच असून बुधवार, ३० आॅक्टोबरला अंभेरपाडा ग्रामपंचायत हद्दीतील बेलाचीवाडी परिसरात रात्रीच्या वेळी झालेल्या वादळी पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. महादू लोहकरे यांच्या घराचे नुकसान झाले असून दुंदा कोकाटे यांच्या वीटभट्टीवर आंब्याचे मोठे झाड उन्मळून पडल्याने नुकसान झाले आहे़ त्याचप्रमाणे चंद्रकांत कोकाटे यांच्या दुकानाचे व मारुती पारधी यांच्या घराची पत्रे फुटल्याने नुकसान झाले आहे.
परतीच्या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. उभे पीक आडवे झाले, शेतातच भिजून कुजल्याने हातातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक आपत्तीने हिरावून घेतल्याने बळीराजाची यंदाची दिवाळी काळी झाली, यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.