टॉवरच्या बहाण्याने फसवणूक
By Admin | Published: February 15, 2016 03:04 AM2016-02-15T03:04:07+5:302016-02-15T03:04:07+5:30
हल्ली कमी वेळेत जास्त पैसे कमविण्यासाठी अनेक शक्कल लढविल्या जातात आणि कष्ट न करता भरपूर पैसे मिळाले पाहिजेत,
कर्जत : हल्ली कमी वेळेत जास्त पैसे कमविण्यासाठी अनेक शक्कल लढविल्या जातात आणि कष्ट न करता भरपूर पैसे मिळाले पाहिजेत, यासाठी अनेक जण खोट्या जाहिरातींना बळी पडतात. अशीच एक जाहिरात पाहून कर्जतमधील एक व्यक्तीचे एका महिन्यात सुमारे साडेतीन लाख रु पये लुटले आहेत. याबबात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
एका वर्तमानपत्रात जानेवारी २०१६ ला गॅलेक्सी टॉवर या कंपनीची ‘छतावर टॉवर लावणे आहे,’ अशी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्या जाहिरातीत काही भ्रमणध्वनी दिले होते. आलेल्या जाहिरातीवरून कर्जतमधील एका व्यक्तीने दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर फोन लावला, त्यावेळी त्याला सांगण्यात आले की तुमच्या जागेत टॉवर बसविला तर आम्ही तुम्हाला ७० लाख रु पये डिपॉझिट व ४५ हजार रुपये महिना भाडे तसेच घरातील एका माणसाला नोकरी देऊ. प्लॉटचा सातबारा उतारा मी एक मेल आयडी करतो, त्यावर पाठवून द्या असे सांगितले. एका महिन्यात एवढे पैसे मिळणार, या विचाराने त्या व्यक्तीने जागेची कागदपत्रे पाठवली. तुमची जागा थ्री-जी व्होडाफोन टॉवर बसविण्याकरिता सिलेक्ट झाली आहे, असे सांगून त्याकरिता रजिस्ट्रेशन फी म्हणून १,५५० रुपये आमच्या वकिलाच्या खात्यात जमा करावे लागतील, असे सांगितले. अशा प्रकारे विविध कारणांनी पैशाची मागणी करून एका महिन्यात त्या व्यक्तीकडून ३,३२,२५० रुपये उकळले आहे. (वार्ताहर)