फणसाड अभयारण्यात पाणीटंचाई नसल्याचा निर्वाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 11:46 PM2019-06-05T23:46:51+5:302019-06-05T23:46:57+5:30

२७ ठिकाणी पाणवठे : वन्यजीवांसाठी मुबलक पाणीसाठा असल्याने प्राणी लोकवस्तीत येत नसल्याचे मत

Fansad Wildlife Sanctuary has no water scarcity | फणसाड अभयारण्यात पाणीटंचाई नसल्याचा निर्वाळा

फणसाड अभयारण्यात पाणीटंचाई नसल्याचा निर्वाळा

Next

संजय करडे

मुरुड : सुमारे ५४ चौरस किलोमीटर क्षेत्रात फणसाड अभयारण्य पसरले आहे. रोहा, मुरुड या दोन तालुक्यांमधून हे क्षेत्र व्याप्त असल्याने वन्यजीव मुक्तपणे फिरण्याचे मोठे आवडते स्थान बनले आहे. या अभयारण्यात २७ नैसर्गिक पाण्याच्या गणी असल्याने फणसाडमधील पशूपक्ष्यांना कधीही पाण्याचा तुटवडा भासत नाही. अथवा पाण्यासाठी हे जंगल सोडून कोणताही वन्यजीव गावाकडे फिरकलेला नाही. विविध ठिकाणी पाण्याचे स्रोत असल्याने वन्यजीवांना मुबलक पाणी मिळत असल्याचे स्पष्टीकरण फणसाड अभ्ययारण्यातर्फे करण्यात आले आहे.

या अभयारण्यात बिबट्या, हनुमान लंगूर, सांबर, भेकर, पिसोरी, ससा, रानगवा, रानटी डुक्कर, खवल्या मांजर, घोरपड, शेकरू, मोर आदीसह विविध पक्षी या अभयारण्यात तळ ठोकून आहेत. विविध सरपटणारे प्राणी यांच्यासह उपयुक्त औषधी वनस्पती यांचासुद्धा मुबलक साठा असल्याने संशोधकांचे वास्तव्य नेहमीच येथे असते. फणसाड अभयारण्य मोठमोठठ्या वृक्षांनी वेढले असल्याने येथील तापमानाची तीव्रता खूप कमी आहे. तसेच समुद्रसपाटीपासून उंचावर असल्याने पावसाचे जास्त प्रमाण असून, थंड हवेचे ठिकाण म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे. मे अखेरपर्यंत ते पूर्ण जून महिना असला तरी येथे असणारे काही पाण्याचे झरे मोठ्या प्रमाणात वाहत आहेत. या ठिकाणी पाण्याची टंचाई भासत नसल्याने फणसाड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र प्रदीप चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले आहे.
मे व जूनच्या माध्यान्ह जरी पाऊस पडला नाही, तरीसुद्धा काही ठिकाणी आम्ही बशी तलाव, पसरत तलाव, असे निर्माण केले असून सोलर पंपाद्वारे निर्माण केलेल्या तलावात पाणी सोडले जाऊन वन्यजीवांची पाण्याची सोय करण्यात आल्याची माहिती या वेळी चव्हाण यांनी दिली आहे. फणसाड अभयारण्यात एकूण सात कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले असून काही ठिकाणी बारमाही पाणी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. विविध ठिकाणी तीन बोअरवेल करण्यात आल्या आहेत. माकड व पक्ष्यांसाठी विविध फळझाडे लावण्यात आलेली
आहेत.

तसेच शेकरू या दुर्मीळ प्राण्याला गारंबीची वेळ हे आवडते खाद्य असून, या वृक्षांचीसुद्धा मोठी लागवड केल्याने या प्राण्याला उत्तम खाद्य मिळाल्यामुळे येत्या काळात शेकरूची संख्यासुद्धा वाढल्याचे निदर्शनास आल्याचे प्रदीप चव्हाण यांनी सांगितले.

शिकारीचे प्रमाण शून्य
या अभयारण्य क्षेत्रात शिकारीचे प्रमाण शून्य असून, रात्रीची नियमित होणारी गस्त त्यामुळे शिकारीला जाणाऱ्यांचे प्रमाण बिलकूल नसल्याचे फणसाड अभयारण्य प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जंगल परिसरात जास्त वृक्षतोड होऊ नये यासाठी आजूबाजूला राहणाºया सर्व ग्रामस्थांना गॅस सिलिंडरची व्यवस्था करून देण्यात आल्याने वृक्षतोड होत नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
महाराष्ट्रातील तुरळक अशा अभयारण्यात शेकरू या दुर्मीळ प्राण्याचे वास्तव्य आढळून येते, त्यामध्ये फणसाड अभयारण्यातील
शेकरूंची संख्या वाढत असल्याने सर्वस्तरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Fansad Wildlife Sanctuary has no water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.