आविष्कार देसाई
रायगड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखताना मानवता धर्म डोळ्यासमोर ठेऊन अलिबाग येथील जिल्हा परिषदेने गेल्या ५७ वर्षांची पंरपरा खंडित केली आहे. दरवर्षी शिवतीर्थ इमारतीमध्ये दहा दिवस विराजमान होणाऱ्या बाप्पाच्या मूर्तीचे दीड दिवसांत विसर्जन केले आहे. जिल्ह्यातील अन्य गणेशोत्सव मंडळांनी असेच सामाजिक हित जपणारे निर्णय घेतले आहेत.
कोरोनाचा कहर अद्यापही थांबलेला नाही. जिल्ह्यात २२ हजारांचा आकडा कोरोना रुग्णांनी ओलांडाला आहे. दिवसामध्ये सुमारे ४०० रुग्ण सापडण्याचे प्रमाण सुरूच आहे. सध्या जिल्ह्यात गणेशोत्सव सुरू आहे. जल्लोषात उत्सव साजरा करण्याची परंपरा या खेपेला मात्र खंडित झाल्याचे दिसून येते. गणेशोत्सवाच्या कालावधीत मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडल्याने गर्दी होणार आहे. त्यामुळे सामाजिक अंतर राखण्याचे नियम धाब्यावर बसविले जाण्याची शक्यता गृहीत धरून, सरकार आणि प्रशासनाने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन गणेशभक्तांना केले आहे. विशेषत: सार्वजनिक मंडळांनी कोरोनाच्या नियमांबाबत अधिक खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने आधीच शांतता समितीच्या सभेतून स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात २८७ सार्वजनिक तर १,००,२३९ खासगी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जाणार असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक बळावली आहे. त्याचे परिणाम पुढील आठ दिवसांमध्ये दिसून येणार असल्याची भीती आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. अलिबाग येथील जिल्हा परिषद इमारतीमध्ये दहा दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. गेल्या ५६ वर्षांपासून अधिकारी आणि कर्मचारी एकत्र येत बाप्पाचा उत्सव मनोभावे साजरा करत आहेत. यंदाचे ५७वे वर्ष आहे. मात्र, या वर्षी कोरोनाचे संकट ओळखून सर्वांनी मिळून चांगला आणि मानवतावादी निर्णय घेतला आहे. दरवर्षी अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. मात्र, दीड दिवसांतच बाप्पाला निरोप देण्यात आला आहे, असे उत्सव समितीचे सचिव समिर अधिकारी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. गेल्या ५६ वर्षांची परंपरा खंडित करताना वाईट वाटले. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्यासाठी असा निर्णय घेणे गरजेचे होते. कारण बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत असतात. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची भीती होती. सर्व मनोरंजनाचे कार्यक्रमही रद्द केले आहेत.मंडपातील दर्शन बंदअलिबाग भाजी मार्के ट येथील बाप्पा तर ५८ वर्षांचा झाला आहे. येथील सन्मित्र मंडळाने भाविकांना मंडपातील दर्शन बंद केले आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत मंडपाच्या बाहेरूनच सामाजिक अंतर राखून दर्शन घेण्याची व्यवस्था केली असल्याचे मंडळाचे अध्यक्ष आश्विन लालन यांनी ‘लोकमत’ला सांगितेल. बाप्पाच्या आगमनाची अथवा विसर्जनाची मिरवणूक काढणार नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.