भरधाव एसटीची दोन कारला धडक
By Admin | Published: December 29, 2016 01:58 AM2016-12-29T01:58:57+5:302016-12-29T01:58:57+5:30
दापोलीकडून बोरीवलीकडे भरधाव वेगात निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसचालकाने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या दोन कारला जोरदार
माणगाव : दापोलीकडून बोरीवलीकडे भरधाव वेगात निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसचालकाने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या दोन कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेगावजवळ बुधवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडला.
दापोली येथून बोरीवलीकडे निघालेली एम.एच. १४ बी.टी. ३९४६ या क्र मांकाची एस.टी. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगात जात असताना तळेगावनजीकच्या
एका वळणावरती वाहनाला
ओव्हरटेक करत असताना याच वेळी मुंबईकडून महाडकडे येणारी एम.एच. ०४ डी.एन. ६४२२ या क्र मांकाच्या स्वीफ्ट डिझायर या कारला धडकली. त्यानंतर पाठोपाठ आलेल्या आय टेन कारला समोरून ठोकर मारली. ही ठोकर एवढी भीषण होती की आयटेन या कारचा चक्काचूर झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच यातील पाच जणांचे प्राण वाचले असले तरी ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचाराकरिता मुंबईत पाठविण्यात आले आहे.
आय टेनमधील निसार सारंग, रिहाना सारंग, कादीर उमर मुसा, शाहीन मुसा, रीमा मुसा (सर्व राहणार नवी मुंबई, नेरूळ) हे पाचही जण एकाच कुटुंबातील सदस्य असल्याचे सांगण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त कारची अवस्था इतकी भीषण होती की कारचालकाला बाहेर काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांना कसरत करावी लागली. अथक परिश्रमानंतर त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सेवाभावी नागरिकांच्या तत्काळ मदतीमुळेच अपघातग्रस्तांचे प्राण वाचले. अपघातानंतर बसचालक मात्र फरार झाला. गोरेगाव पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेऊन महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला. (वार्ताहर)