कर्जत : तालुक्यातील नगरपरिषद हद्दीला लागून असलेल्या लाखरन गावातील शेतकऱ्याने रताळ्याचे अमाप पीक घेतले असून एका रताळ्याचे वजन तब्बल साडेतीन किलो आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक घेण्याबरोबरच अन्य पीक घेण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे हे या प्रयोगावरून सिद्ध झाले आहे.लाखरन येथील शेतकरी सूर्यकांत किसन भासे हे आपल्या शेतीवर विविध प्रयोग करीत असतात. यापूर्वी त्यांनी केळी, हळद, आले, भुईमूग आदी अपारंपरिक पिके घेऊन शेतकऱ्यांसाठी वेगळी दिशा दिली होती. ही पिके आपल्याकडे होत नाहीत हे जुन्या शेतकऱ्यांचे म्हणणे खोडून काढले होते व विक्रमी पिके काढून दाखविली होती. यावेळी त्यांनी रताळ्याचे विक्रमी पीक काढले असून एक ते साडेतीन किलोपर्यंत एकेका रताळ्याचे वजन आहे. त्यांना ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, श्रद्धा फाउंडेशन आशा अनेक संस्थांकडून प्रगतशील शेतकरी म्हणून अनेक पुरस्कार मिळाले आहेत.पुणे येथील एक कंपनी व जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती पुंडलिक पाटील हे भाजीपाला व फळांच्या अपारंपरिक पिकांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या एक शेतकऱ्यांचा समूह तयार करीत असून गेली तीन वर्षे ते याबाबत प्रयत्नशील आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना लागणारे अद्ययावत बियाणे, खते इतरही मार्गदर्शन केले.मी नेहमी वेगवेगळे शेतीचे प्रयोग करून जास्तीत जास्त उत्पादन कसे निघेल याकडे लक्ष देतो. रताळ्याचे पीक घेताना मल्चिंग पेपर व सिलिकॉन खताचा खूप फायदा झाला- सूर्यकांत भासे, प्रगतशील शेतकरीशेतकरी शेतीचे चांगले उत्पन्न मिळावे यासाठी शेतकऱ्यांचा समूह तयार करण्यामागे एका शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अन्य शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा हाच प्रामाणिक हेतू आहे.- पुंडलिक पाटील, माजी बांधकाम सभापती, राजिप.
शेतकऱ्याने पिकविले साडेतीन किलोचे रताळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 1:04 AM