आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यातील धान खरेदीसाठी सरकारने तब्बल १ हजार ५५० रुपयांचा हमी भाव जाहीर केला आहे. परंतु यावर्षी अद्याप सरकारने बोनस जाहीर न केल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदाचा हमी भाव हा एका क्विंटलमागे १२० रुपयांनी कमी दिला आहे. त्यामुळे तब्बल ३१ कोटी ५० लाख रुपयांचा फटका जिल्ह्यातील शेतकºयांना बसण्याची शक्यता आहे. सरकारने अधिवेशनामध्ये बोनस जाहीर केल्यास शेतकºयांना चांगला दर मिळणार असल्याचे बोलले जाते.जिल्ह्यात एक लाख पाच हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्या माध्यमातून २६ लाख २५ हजार क्विंटल भाताचे उत्पादन होण्याचा कृषी विभागाने व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला तर, रायगड जिल्ह्यात ४०६ कोटी ८७ लाख ५० हजार रुपयांची विक्रमी उलाढाल होणार आहे.कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न होण्यासाठी सरकारने जाहीर केलेला एक हजार ५५० रुपयांचा हमी भाव गृहीत धरला आहे. त्यामुळे शेतकरी चांगलेच मालामाल होणार असल्याचे बोलले जाते. केंद्र सरकार देशात सर्वत्र एकच हमी भाव जाहीर करते.गेल्या पाच वर्षांच्या हमीभावावर नजर टाकली असता २०१६-१७ साली सरकारने एक हजार ४७० अधिक २०० रुपये बोनस असा एकूण एक हजार ६७० रुपयांचा हमी भाव दिला होता. त्याचप्रमाणे २०१५-१६ एक हजार ४१० अधिक २५० (१६१० रुपये), २०१४-१५ एक हजार ३५० रुपये, तर २०१३-१४ साली एक हजार २६० अधिक २०० रुपये बोनस (१४६० रुपये) असा दर दिला होता.सरकारने यंदासाठी एक हजार ५५० रुपये प्रति क्विंटल दर जाहीर केला आहे, मात्र त्यामध्ये बोनस जाहीर केलेला नाही. त्यामध्ये २०० रुपये बोनस जाहीर केला असता तर, एक हजार ७५० रुपये प्रति क्विंटल हमी भाव शेतकºयांना मिळाला असता.सरकारने आतासाठी एक हजार ५५० रुपये हमीभाव दिला आहे. गेल्यावर्षी सरकारने १ हजार ४७० अधिक २०० रुपये बोनस असा एकूण एक हजार ६७० हमी भाव दिला होता. यंदा बोनस जाहीर न केल्याने १२० रुपये प्रतिक्विंटल कमी दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकºयांचे चांगलेच आर्थिक नुकसान होणार असल्याचे दिसून येते. रायगड जिल्हा हे पूर्वी भाताचे कोठार म्हणून ओळखले जायचे त्यानंतर औद्योगिकरणाच्या रेट्यामध्ये ती ओळख आता पुसटशी होत आहे. उद्योगांसाठी जमिनी गेल्याने शेतीचे क्षेत्र कमी झाले आहे. २०१७-१८ साठी जिल्ह्यात १ लाख ५ हजार हेक्टरवर भाताच्या लागवडीचे क्षेत्र आहे.
शेतक-यांना ३१ कोटी ५० लाखांचा फटका, भाताला क्विंटलमागे १२० रुपये कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 2:21 AM