महाडमधील शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत;अवकाळी पावसाचाही फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:03 AM2018-11-20T00:03:40+5:302018-11-20T00:03:52+5:30
कोकणात यंदा चांगला पाऊस पडला, मात्र पाऊस लांबल्याने काही ठिकाणी ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. नोव्हेंबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसानेही भातशेतीचे नुकसान झाले.
दासगाव : कोकणात यंदा चांगला पाऊस पडला, मात्र पाऊस लांबल्याने काही ठिकाणी ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. नोव्हेंबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसानेही भातशेतीचे नुकसान झाले. मात्र दोन्ही वेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आकडा हा नाममात्र असल्याने सांगून कार्यालयात बसूनच पंचनामे करण्यात आल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. त्यातही ज्या शेतकºयांनी विमा काढला आहे, त्या शेतकºयांच्या नुकसानीबाबत विमा कंपनीला माहितीच नसल्याचे समोर आले आहे.
महाड तालुक्यात पावसाळ्यात आलेल्या पुराच्या पाण्याने सखल भागातील शेतीचे मोठे नुकसान झाले होते. महाड शहराजवळ असलेल्या सावित्री नदी किनारील गावांपैकी करंजखोल, चांभारखिंड, दासगाव, तर गांधारी किनारील मोहोप्रे, नाते, लाडवली, कोल, कोथेरी, वाळण, बिरवाडी आदी गावात नुकसान होते. पुराचे पाणी शेतात साचून राहिल्याने पीक कुजले. यावेळी झालेल्या नुकसानीचे पंचनामे व्हावेत म्हणून शेतकरी मागणी करत होते, मात्र ठरावीक गावातच पंचनामे झाले.
जुलै ते आॅगस्ट दरम्यान झालेल्या नुकसानीमध्ये केवळ १८१ शेतकºयांचे नुकसान पंचनामे करण्यात आले आहेत. या पूरपरिस्थितीमुळे ५१.८४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाचे अधिकारी सांगत आहेत. महसूल आणि कृषी विभागाने संयुक्तरीत्या हे पंचनामे केले असले तरी अद्याप नुकसानीची भरपाई शासनाकडून शेतकºयांना प्राप्त झालेली नाही.
हीच अवस्था नोव्हेंबर महिन्यात झाली आहे. अवकाळी पावसाने महाड तालुक्यात भात पिकाचे नुकसान झाले. भात कापणीच्या वेळी पाऊस आल्याने ज्या शेतकºयांनी भात कापले होते, त्यांचे अतोनात नुकसान झाले. अनेकांचा पेंढा देखील भिजून गेला. यावेळी देखील कृषी आणि महसूल विभागाने दुर्लक्ष केले. केवळ ३३ शेतकºयांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या कागदावर नोंद करण्यात आली आहे. याबाबत विमा कंपनी देखील स्वतंत्रपणे पंचनामा करणार असल्याचे सांगितले असले तरी ज्या कंपनीचे प्रतिनिधी या विभागात कार्यरत आहेत त्यांना याबाबत माहितीच नाही.
पुरातील नुकसानीचे पंचनामे करून पाठवण्यात आले आहेत तर नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे देखील पंचनामे झाले आहेत. मात्र अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही
- विजय पांढरे,
तालुका कृषी अधिकारी