नेरळ : कर्जत तालुक्यात शेतीच्या माध्यमातून बहुतांश शेतकरी भातपिकाचे उत्पन घेतात. या पिकविलेल्या उत्पादनाला चांगला मोबदला मिऴावा, म्हणून शासनाच्या माध्यमातून भात खरेदी केंद्राची संकल्पना राबवून शेतकऱ्यांचा भात थेट या केंद्रात खरेदी केला जाऊ लागला, परंतु गेल्या वर्षभरापासून नेरळ आणि परिसरातील १२ शेतकरी नेरळ येथील भात खरेदी केंद्रात आपल्या विक्री केलेल्या भाताचे पैसे मिळावे, म्हणून चकरा मारत असून, त्यांना वर्षभर वेगवेगळी कारणे आणि उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने हे सर्व शेतकरी आंदोलनाच्या पवित्रात असून, जोपर्यंत पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत केंद्रात नवीन भात खरेदी करू देणार नाही, असा इशारा दिला आहे.
शासनाच्या माध्यमातून हमखास चांगला भाव आणि पैसेही हमखास मिळणार या आशेने चांधई, कोदिवले, बार्डी, नेरळ, कळंब, उकरुळ, चिंचवली, तळवडे, भडवळ, बोरगाव, माणगांव, वंजारपाडा या गावातील १२ शेतकऱ्यांनी मागील वर्षी आपले भात या केंद्रात विक्री केली. या शेतकऱ्यांनी यावेळी बँक खात्याची माहितीही जमा केली आणि शेतकऱ्यांना भातविक्रीचा मोबदला त्यांच्या खात्यात जमा होईल, असे सांगण्यात आले, परंतु काही तांत्रिक अडचणी, चुका केंद्राकडून झाल्याने शासनाकडून पैसे आजपर्यंत येऊ शकले नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर आमचे पैसे देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून, जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत या वर्षी भात खरेदी केंद्र सुरू करून देणार नाही, असा निर्धार नेरळ परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे.
- गेल्या वर्षभरापासून आम्ही सर्व शेतकरी वेळोवेळी नेरळ येथील भात खरेदी केंद्रात पैसे कधी मिळणार, याबाबत पाठपुरावा करत असून, आम्हाला प्रत्येक वेळी नवनवीन कारणे दिली जात आहेत. कधी मशीनमध्ये खराबी आहे, कधी खातेक्रमांक चुकीचा दिला आहे, कधी नाव चुकीचे आहे, अशी विविध कारणे दिली जात आहेत.
- गेल्या वर्षभरापासून कोविडसारख्या महामारीच संकट आले. अवकाळी पावसामुळे भातपिकाचे नुकसान झाले, यामुळे आमच्या हक्काच पैसे असूनही आम्हाला वर्षभर हेलपाटे मारावे लागत असून, अजूनही पैसे कधी मिळणार, याबाबत कोणतेही ठोस आश्वासन मिळत नाही. आमचे पैसे जोपर्य़ंत आम्हाला मिळत नाही, तोपर्यंत आम्ही केंद्राला नवीन भात खरेदी करून देणार नाही, असे कोदिवले येथील शेतकरी वसंत चहाड यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचे पैसे काही तांत्रिक अडचणीमुळे अडकले असून, आम्ही या शेतकऱ्यांची थकबाकी लवकर मिळावी, यासाठी प्रयत्न करत आहोत. ऑनलाइन कामामध्ये काही त्रुटी राहिल्याने पैसे जमा झाले नाहीत, परंतु महिनाभरात शेतकऱ्यांचे पैसे जमा होतील. - विष्णू कालेकर, नेरळ भातविक्री केंद्राचे प्रमुख.