मधुकर ठाकूर
उरण: शेतकऱ्यांना शेतीबाबतचे पूरक ज्ञान व विविध योजनांची माहिती असणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन उरण तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ - नारनवर यांनी केले. हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती दिवशी उरण तालुका कृषी कार्यालय आणि उरण पंचायत समिती कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने शनिवारी (१) उरण पंचायत समितीच्या सभागृहात कृषी दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी त्या आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्या बोलत होत्या.
याप्रसंगी व्यासपीठावर मंडळ कृषी अधिकारी किसन शिगवण, विस्तार अधिकारी साळवे, प्रकाश ठाकूर, प्रफुल्ल खारपाटील, कृषी पर्यवेक्षक शिवाजी लोहकरे, कृषी सहाय्यक निखिल देशमुख, कृषी सहाय्यक आर. पी. भजनावळे ,कृषी सहाय्यक सुरज पाटील, कृषी सहाय्यक विभावरी चव्हाण तसेच अन्य कृषी अधिकारी , कृषीमित्र व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापुढे अर्चना सुळ यांनी कृषी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना विकसित ज्ञानाबरोबर विविध शासकीय योजनांची माहिती देणे हे कृषी विभागाचे काम असून, शेतकऱ्यांना आता पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत हंगामातील पिकांसाठी विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पीक विमा काढता येणार आहे. विम्याची उर्वरित रक्कम राज्य सरकार अदा करणार आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या नोंदी सातबाऱ्यावर करून, घ्याव्यात .नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी शासनाचा या मागचा हा उद्देश असल्याचे , त्यांनी सांगितले. तदनंतर मंडळ कृषी अधिकारी किसन शिगवण यांनी गटशेती संकल्पना आणि प्रकल्पाच्या कार्यपद्धती विषयी सविस्तर माहिती दिली. या माध्यमातून सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती करण्यावर शेतकऱ्यांनी अधिक भर द्यावा असे आवाहन त्यांनी केले. तर उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी प्रकाश ठाकूर यांनी शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. मुसळधार पाऊस, परतीचा पाऊस व अवकाळी पाऊस या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अडचणीत आला असून, सद्यस्थितीत हा कणा मोडून पडताना दिसत आहे. तर प्रगतशील शेतकरी प्रफुल्ल खारपाटील यांनी भाताची चार सूत्री लागवड ,रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड आणि विविध शेती विषयक योजना आदी विषयावर सविस्तर माहिती दिली.
दरम्यान २०२१-२२ व २०२२-२३ मध्ये घेण्यात आलेल्या भात पीक स्पर्धेत सलग दोन वर्ष प्रथम क्रमांकाने येणाऱ्या प्रफुल्ल काळूराम खारपाटील (चिरनेर) यांना तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तर भातपीक स्पर्धेत मधुकर रामकृष्ण पाटील (द्वितीय) व दत्ताराम पांडुरंग पाटील (तृतीय) क्रमांकाचे मानकरी ठरले. त्यांनाही प्रशस्तीपत्र देऊन, सन्मानित केले .त्याचबरोबर महिला कृषी उद्योजक शेतकरी नेहा भोईर आणि सर्व गावातील कृषीमित्र शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.