जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याच्या पैशाची प्रतिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 04:15 PM2023-11-12T16:15:53+5:302023-11-12T16:16:19+5:30

आंब्याचे 14 हजार हेक्टर क्षेत्र असून उत्पादनक्षम क्षेत्र 12 हजार 500 हेक्टर आहे.

Farmers of the district are waiting for insurance money | जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याच्या पैशाची प्रतिक्षा

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याच्या पैशाची प्रतिक्षा

निखील म्हात्रे

लोकमत न्युज नेटवर्क
अलिबाग - अवकाळी पाऊस व हवामान बदलामुळे गतवर्षी हजारो हेक्टर आंबा पिकाचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना फळपिक विमा मिळण्याची आशा होती. मात्र दिवाळी आली तरीही शेतकऱ्यांना ही भरपाई मिळालेली नसल्याने त्यांच्याच कमालीची नाराजी आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग, रोहा, मुरूड, श्रीवर्धन,माणगांव, म्हसळा या तालुक्यात मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड केली जाते.

आंब्याचे 14 हजार हेक्टर क्षेत्र असून उत्पादनक्षम क्षेत्र 12 हजार 500 हेक्टर आहे. भात शेतीखालोखाल फळबागांच्या उत्पादनाकडे पाहिले जाते. जिल्ह्यात वीस हजारपेक्षा अधिक आंबा उत्पादक शेतकरी आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळावे म्हणून सरकारने प्रधानमंत्री फळ पिकविमा योजना सुुरू केली आहे. दरवर्षी हेक्टरी 29 हजार 400 रुपये विम्याचा हप्ता शेतकऱ्यांकडून घेतला जात आहे. गेल्या वर्षी अवकाळी पावसासह बदलत्या हवामानामुळे आंबा उत्पादनाचे प्रचंड नुकसान झाले. सात हजार 850 शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला. सुमारे चार हजार हेक्टरपेक्षा अधिक आंबा पिकाचे नुकसान झाले.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी सात हजार 456 शेतकऱ्यांनी फळ पीक विम्यासाठी नोंदणी केली. परंतु आजतागायत या शेतकऱ्यांना त्यांच्या विम्याचे पैसे सरकारकडून मिळाले नाहीत, अशी माहिती समोर येत आहे. केंद्राकडून सबसिडी मिळण्यास दिरंगाई झाल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी विम्याच्या प्रतिक्षेत आहेत. सरकारने दिवाळीपूर्वी विम्याचे पैसे खात्या जमा होतील असे आश्वासन दिले. मात्र दिवाळी सुरू होऊनदेखील विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही. त्यामुळे सरकारचे आश्वासन पोकळ ठरल्याचे समोर आले आहे.

फळ पिक विम्याचे निकष रायगड जिल्ह्यासाठी चुकीचे आहेत. विम्याचा प्रिमिअम चौपट केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात 56 हजार आंबा उत्पादक असतानाही फक्त दहा टक्के आंबा उत्पादक शेतकरी विमा भरतात. झालेल्या नुकसानीची भरपाई पदरी पडत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे.
- चंद्रकांत मोकल, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ

फळ पीक विम्याचा हप्ता हेक्टरी 29 हजार 400 आहे. जिल्ह्यातील सात हजार 456 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 28 शेतकऱ्यांचे अर्ज फेटाळल्यात आले आहे. त्यामुळे सात हजार 428 अर्ज पात्र ठरले आहेत. केंद्र सरकारकडून सबसिडी आली नव्हती. परंतु दिवाळीच्या दोन दिवस अगोदर विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील.
- शरद कबाडे, जिल्हा समन्वयक.

गेल्यावर्षी बदलत्या हवामानाबरोबरच अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे प्रचंड नुकसान झाले. सुमारे तीन लाखपेक्षा अधिक फटका बसला. फळ पिक विम्याची प्रतिक्षा गेल्या वर्षभरापासून आहे. अजूनपर्यंत विम्याचे पैसे मिळाले नाहीत.
- मनोज पाटील, आंबा उत्पादक शेतकरी

Web Title: Farmers of the district are waiting for insurance money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी