1926चा शहापूर-धेरंडच्या शेतक-यांचा महाराष्ट्रातील पहिला शेतकरी संप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 05:08 PM2018-02-20T17:08:16+5:302018-02-20T17:08:23+5:30
अलिबाग तालुक्यांतील पेझारी येथील नादिरशा बारिया हे त्याकाळी शहापूर-धेरंडमधील 700 एकर भातशेतीचे मालक होते. सोली शेठ, अदी शेठ, हुरमोजी हे त्यांचे वंशज होते. परंतु आज त्यांचे कोणीही वंशज येथे नाहीत.
- जयंत धुळप
रायगड- अलिबाग तालुक्यांतील पेझारी येथील नादिरशा बारिया हे त्याकाळी शहापूर-धेरंडमधील 700 एकर भातशेतीचे मालक होते. सोली शेठ, अदी शेठ, हुरमोजी हे त्यांचे वंशज होते. परंतु आज त्यांचे कोणीही वंशज येथे नाहीत. शहापूरला पोयनाड येथील मारवाडी, सावकार तसेच पेझारी येथील पारशी यांनी मजुरी देऊन समुद्र मागे हटवून जमिनीचे कोठे तयार करून नंतर त्याचे भाग करून त्याच मजुरांना शेती कसायला दिली. आणि येथील आगरात भातशेतीचा प्रारंभ झाला. आगरात भातशेती करणारे ते आगरी अशी तत्कालीन शेतमजुराची संज्ञा निश्चित झाली. आज या आग-यांची शहापूरला सातवी पिढी कार्यरत असल्याची माहिती 96 वर्षीय शहापूर ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच शांताराम महादेव भगत यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.
आग-यांच्या सात पिढ्याच्या कष्टातून आताचे एकूण 3500 एकर भातशेती क्षेत्र तयार झाले आणि धोया कोठा, नानी, बेडी, ठाकुर्ली, धोय, लहरी, मांडलेशील सरखार, मोरा, खर्नय, अंगर भोय, भगांर कोठ्यात यामध्ये विभागले असून, प्रत्येक कोठ्याचा स्वतंत्र जागृत देव आहे. या 3500 एकर भातशेती क्षेत्रापैकी एकट्या नादिरशा बारिया (पेझारी) पारशी समूहाची 700 एकर भातशेती शहापूर (अलिबाग) मध्ये होती. नादिरशा बारिया एकरी 12 मण भात स्वत:ला व 8 मण भात ती शेती प्रत्यक्ष कसणा-या कुळाला देत असे. यामध्ये कसणा-यांनीच त्याच्या वाट्याला आलेली समुद्र काठची संरक्षक बांधबंदिस्ती करायची असे बंधनकारक असायचे. आजच्या सातव्या पिढीला देखील ते बंधनकारक आहे. बारिया यांच्या नावाने पेझारी येथे प्राथमिक शाळा आहे. सध्या पेझारीमध्ये धुमाळ यांच्या घरापुढे गेले की पेझारी गावात नादिरशा परश्याच्या वाड्याचे जमीनदोस्त झालेले काही अवशेष पाहायला मिळत असल्याचे शांताराम भगत यांनी सांगितले.
1926 साली या 700 एकर मालकी असलेल्या नादिरशा बारिया यांनी ज्या जमिनी शहापूरच्या शेतमजुरांना मक्त्यांनी दिल्या होत्या व त्यामध्ये एकरी 20 मण भात पिकते असे गृहीत धरून सावकाराला 12 मण व कसणा-या मजुराला 8 मण असा समझोता करार असताना देखील, अचानक त्यांनी ढेपी मक्ता सुरू केला. ढेप म्हणजे ढेकूळ त्यावर येणारे सर्वच पीक पारशाला द्यायचे असा मक्ता सुरू केला. त्यावर 700 एकरच्या कुळांनी एकमुखी निर्णय घेऊन एक वर्ष संप केला. त्या वेळचे शेतक-यांचे नेते केशव धोत्र्या भगत, गोविंद कचर भगत, महादेव मढवी, गोविंद कमळ पाटील, बटू कमळ पाटील, बाळू हरी पाटील, पोशा तांडेल यांनी प्रतिनिधित्व करून संपाची मागणी 10-10 अशी केली.
20 मण एकरी भात पिकेल त्यातील अर्धे कुळाला व अर्धे सावकाराला म्हणजे समन्यायी वाटपाची मागणी व ज्याला ग्रामीण भाषेत अर्धल म्हटले जाते. ही अर्धलीची मागणी चरीच्या संपाच्या अगोदर संपूर्ण महाराष्ट्रात शहापूरच्या शेतक-यांनी प्रथम केली. आणि जोपर्यंत अर्धल मिळत नाही तो पर्यंत शेती कसणार नाही असा निर्णय पारशाला सांगण्यासाठी शेतक-यांनी जाण्याचे ठरवल्याचे शांताराम भगत यांनी सांगितले.
पोशा तांडेल याची हत्या केली गुंडांनी, शिक्षा भोगली संपकरी शेतक-यांनी या संपात सहभागी झालेल्या पैकी काही शेतकरी फितूर झाले व ही बातमी पारशापर्यंत पोहोचवली. ज्या दिवशी हे शिष्टमंडळ मागणी घेऊन पेझारीच्या नादिरशा पारशाच्या बंगल्यावर पोहोचले तेथे अगोदरच पारशांनी मुंबईहून गुंड आणून ठेवले होते. शिष्टमंडळातील अग्रणी पोशा तांडेल (तांडेल हे नाव ते मचव्यावर काम करीत असत म्हणून आहे) होता. चर्चा चालू असतानाच याना गुंडांनी घेरले व पारशाच्या बंगल्यासामोरच पोशा तांडेल याची हत्या केली. आणि उलट शिष्टमंडळाच्या नेत्यानीच पोशा तांडेलची हत्या केली, असा बनाव तयार करून त्या वेळी ब्रिटिश सरकारच्या न्यायालयाने मजुरांच्या या सर्व नेत्यांना सह महिने सक्तमजुरीची शिक्षा दिली. त्या वेळी शहापूरच्या शेतक-यांनी अलिबागमधून दिलेला वकील देखील पारशाला फितूर झाला. नंतर या केससाठी मुंबईहून बॅ. वाक्रुळकर यांना त्याकाळी 7 हजार रुपये फी देऊन आणले. या केसमधून पारशांनी स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी नळबाजार (मुंबई) येथील त्याच्या 14 माड्यांपैकी एक माडी 5 लाख रुपयांना विकल्याची आठवण शांताराम भगत यांनी सांगितले.
शेतक-यांचा शाप, अर्धल केली मान्य आणि शापाची प्रचिती सर्वच नेते शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा सर्व गावकी पारश्यांच्या बंगल्यावर हातात रिकामी मडकी घेऊन गेली ती मडकी त्याच्या दारात फोडून तुझ्या या सगळ्या पिढ्यांचे वाटोळे होईल असा शाप देऊन परत आली. या संप काळात शेती जरी ओस ठेवली तरी समुद्र काठचे बांध शेतक-यांनी (कुळांनी) बांधून काढून शेती शाबूत ठेवली हे विशेष होते. पारशाची 700 एकर शेती जरी ओस असली तरी शेतक-यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून इतर सावकारांकडून जमिनी कसण्यास घेतल्या होत्याच, शेवटी घाबरून नादिरशाने तडजोड केली व अर्धल मान्य केली. महाराष्ट्रामध्ये समन्याय पद्धतीची शेती पद्धत म्हणजेच अर्धा वाटा कुळाला व अर्धा वाटा सावकाराला म्हणजेच अर्धल मिळवून देणारा पहिला शेतक-यांचा संप शहापूर (अलिबाग) येथे झाला. या पिढीचे 96 वर्षीय शांताराम महादेव भगत आज देखील हा इतिहास भराभर सांगतात व अभिमानाने म्हणतात चरीचा संपाच्या अगोदर, आमच्या वाडवडिलांनी संप केला अर्धल मिळवली व चरीच्या संपाची मागणीचा पाया 1926 च्या शहापूरच्या आंदोलनानी रचल्याचे भगत यांनी सांगितले.
तेव्हा आणि आत्ता शेतकरीच लढवतोय लढा
आमचा इतिहास दडवला गेला याचे आम्हाला दु:ख आहे. त्या वेळेस शेतकरी फितूर झाले सद्यस्थितीत टाटा रिलायन्स लढ्यात देखील शेतकरी फितूर झाले. त्या वेळेचा 1962 सालचा लढा शेतक-यांनीच दिला, आज देखील टाटा रिलायन्सच्या विरोधातील लढा राजकीय शक्तींना बाजूला ठेवून शेतकरीच लढवतोय हा शहापूरचा इतिहास असल्याचे ते म्हणाले.
व्यक्तिगत फायद्यासाठी शेती बुडवतात त्यांना कोठ्याचा देव शिक्षा देतो
जमिनीवर जो कोणी डोळा लावील त्याचे वाटोळ होईल त्याची प्रचिती पूर्वीपासून आतापर्यंत येते आहे. जे कोणी त्याच्या व्यक्तिगत फायद्यासाठी शेती बुडवतात त्यांना देखील याची प्रचिती येईल कारण हे जे भातशेतीचे कोठे आहेत त्या प्रत्येक कोठ्याचा देव आहे व त्या देवाच्या स्थानाच्या मळणीच्या वेळेस पूजा करून त्याला मान दिला जातो. गावच्या जमिनी ज्या रिलायन्सच्या भूसंपादनात समाविष्ट झाल्या होत्या. त्या सहा वर्षाच्या शेतकरी लढ्यानंतर पुन्हा मुक्त झाल्या.1926चा लढा आणि 2005 ते 2011 चा शेतकरी लढा या दोन्ही लढ्यांचे साम्य म्हणजे शेतकर्यांना त्याचा हक्क प्राप्त झाला त्यांचा विजयी उत्सव गुढी पाडव्यास खिडकी (अलिबाग) येथे गेल्या 23 मार्च 2012 रोजी दुपारी श्रमिक मुक्तीदलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाने साजरा करण्यात आल्याची देखील आठवण शांताराम भगत यांनी अखेरीस सांगीतले. शांताराम भगत यांचे नातू राजन भगत यांनी शहापूर धेरंड नऊगांव खारेपाट कृती समितीच्या माध्यमातून या सा-या इतिहासाचे संकलन करून ठेवले आहे.