अलिबाग : महाराष्ट्रात जे जे चांगले आहे, ते ते हिसकावले जात आहे. महाराष्ट्रावर रोज अत्याचार होत आहेत, अशी खंत व्यक्त करत रायगड जिल्ह्यातही विविध प्रकल्प, कॉरिडॉर आणि विकासाच्या नावाने दलालांमार्फत जमिनी विकत घेतल्या जात आहेत. प्रकल्पाला जमीन मागितली जात असेल तर शेतकऱ्यांनी त्यात पार्टनरशिप मागावी, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगडकरांना दिला आहे.
अलिबाग येथे सोमवारी रायगड भूमी रक्षणासाठी मनसेतर्फे जमीन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज ठाकरे यांनी भूसंपादनामुळे होणाऱ्या परिणामांबाबत पत्रकारांशी संवाद साधला. जमिनी राहिल्या नाहीत तर तुम्ही बेघर व्हाल. त्यामुळे जमिनी विकू नका. सध्या कुंपणच शेत खात आहे. जिल्हा शांतपणे पोखरत चालले आहेत. तो वाचविणे गरजेचे आहे. जमीन घेणारे बाहेरचे असले तरी त्यामागे राजकीय हस्तक्षेप आहे. दलाल कवडीमोल भावाने जमीन विकत घेऊन चढ्या भावाने समोरच्याला विकत आहेत. त्यामुळे येथील भूधारक बेघर होण्याच्या मार्गावर असल्याचे त्यांनी विविध दाखले देत सांगितले.
अप्पासाहेब धर्माधिकारींची घेतली भेटरेवदंडा येथे सकाळी पद्मश्री डाॅ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. आपणही शेतकऱ्यांमध्ये जमिनी विकू नका, याबाबत जनजागृती करा, यासाठी त्यांची भेट घेतल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.
मराठी उद्योजक असेल, तर मदत कराजमीन भुसभुशीत असेल तर घुशी लागतात. कडक असेल तर नाही. पुणे जिल्ह्यातील हिंजवडी हे गाव आज गायब झाले आहे. तशीच जिल्ह्यातील गावे गायब होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जमिनी विकून आपले अस्तित्व मिटवू नका. पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असून, आपणच शेतकऱ्यांना शिक्षित करा, असे आवाहनही त्यांनी पत्रकारांना केले.