शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये
By Admin | Published: August 10, 2015 11:46 PM2015-08-10T23:46:36+5:302015-08-10T23:46:36+5:30
जागतिकीकरण, पर्यावरण यांच्यामुळे येणारे बदल समस्या म्हणून उभे राहात असताना, संकटाला सामोरे जाण्याचे धारिष्ट सोडून शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग
अलिबाग: जागतिकीकरण, पर्यावरण यांच्यामुळे येणारे बदल समस्या म्हणून उभे राहात असताना, संकटाला सामोरे जाण्याचे धारिष्ट सोडून शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग स्वीकारु नये असे मत ज्येष्ठ कादंबरीकार आनंद विंगकर यांनी सोमवारी व्यक्त केले आहे.
विद्यार्थ्यांमधील भाषा व साहित्यगुणांना व्यासपीठ मिळावे या हेतूने येथील जे.एस.एम्. कॉलेजमध्ये दरवर्षी ‘भाषा व वाङ्मय अभ्यास मंडळ’ची स्थापना करण्यात येते. यंदाच्या या स्थापनेच्या निमित्ताने कला शाखेच्या दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमात असलेल्या ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट’या कादंबरीचे लेखक आनंद विंगकर यांना विशेष निमंत्रित करुन ‘लेखक आपुल्या भेटीला’या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्याच हस्ते ‘भाषा व वाङ्मय अभ्यास मंडळा’चे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील उपस्थित होते. त्यावेळी कादंबरीकार विंगकर हे बोलत होते. विंगकर यांनी आपला कादंबरी लेखनाचा अनुभव कथन करुन, विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ न कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेवर प्रकाश टाकला.
यावेळी आयोजित ‘पाऊ स-कविता वाचन’ या उपक्रमांत विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील ‘पाऊ स’ या विषयावर आधारित स्वरचित व मान्यवर कवींच्या कविता सादर केल्या. पावसाची विविध रुपे चित्रित करणाऱ्या या कवितांनी कार्यक्रमात चांगलाच रंग भरला. यावेळी मराठी, हिंदी, इंग्रजी विषयाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.ए.मराठीची विद्यार्थिनी हर्षला महाजन हिने केले तर एस.वाय.बी.ए.चा विद्यार्थिनी मनाली घरत हिने उपस्थितांचे आभार मानले. यावेळी मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.नीलकंठ शेरे, प्रा.जयेश म्हात्रे, प्रा.कपिल कुलकर्णी, प्रा.नरेंद्र पाटील, प्रा.सुप्रिया धुमाळ आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)