कर्जत :कर्जत तालुक्यातील १५०० हेक्टर जमिनीवरील भातपिकाचे नुकसान परतीच्या पावसाने केले आहे. नुकसानग्रस्त पिकाचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. धानमंत्री पीक विमा योजनेत ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे त्या शेतकऱ्यांना विमा प्राप्त होण्यात काही अडचणी असल्यास त्यांनी आपल्याला थेट संपर्क साधावा, असे आवाहन कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.
कर्जत तालुक्यातील कडाव, सुगवे, मानिवली आणि बिरदोले येथील शेतीवर जाऊन शेतपिकांची पाहणी खासदार श्रीरंग बारणे यांनी आज २२ ऑक्टोबर रोजी केली. कडाव येथे विलास बडेकर आणि पुंडलिक माळी, सुगवे येथील पेमारे यांच्या शेतात, बिरदोले गावातील शैलेश जामघरे, रवींद्र जाधव आणि अवधूत जामघरे यांच्या शेतातील बांधावर जाऊन पाण्याने भरलेल्या पिकाची पाहणी खासदार बारणे यांनी केली. या वेळी दौऱ्यात प्रशासनाच्या वतीने सहभागी झालेल्या लोकमत न्यूज नेटवर्क खासदार श्रीरंग बारणे यांनी सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भातपिकाचे सरसकट पंचनामे करावेत, अशी सूचना केली. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे केले जात आहेत. शेतकऱ्यांकडून बँक पासबुक, आधार कार्ड आणि विमा काढला असल्यास त्याचे पेपर घ्यावेत म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात मदत देण्याची कार्यवाही करणे सोपे जाईल, अशी सूचना तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदार यांना केली. ज्या शेतकऱ्यांनी भातपिकाचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत विमा काढला आहे त्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे विम्याची पावती द्यावी. त्यातूनदेखील विम्याचे संरक्षण मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी थेट आपल्याला फोन करून माहिती द्यावी, अशी सूचना केली आहे.
या वेळी एकही नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले आहे. खासदार बारणे यांच्यासह तालुका पंचायत समितीच्या सभापती सुजाता मनवे, कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्यासह कर्जतच्या प्रांत अधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार विक्रम देशमुख, तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे आदी उपस्थित होते.
नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी -दासगाव - यंदा परतीच्या पावसाने संपूर्ण कोकणाला झोडपून काढले. या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले भातपीक शेतीमध्ये झोपून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर काही प्रमाणात उभ्या असलेल्या भातपिकाच्या शेतीमध्ये आजही मोठ्या प्रमाणात पाण्याचे तलाव तुंबले आहेत. अशा शेतकऱ्यांची शेतीदेखील धोक्यात आली आहे. इतर शेतीच्या पंचनाम्याबरोबर याही शेतकऱ्यांचे पंचनामे होणे गरजेचे आहे. मात्र अशा शेतकऱ्यांचे पंचनामे न करता त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. कृषी खात्याकडून घाईगडबडीने केले जाणारे पंचनामे थांबवून सर्व नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.महाड तालुक्यातदेखील पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. हातातोंडात आलेले पीक शेतात झोपून गेले तर काही आजही पाण्यात उभे आहे. मात्र शेतीमधून यंदा भातपिकाची आशा निघून गेली आहे. कृषी विभागामार्फत पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. हे पंचनामे फक्त झोपलेल्या शेतीचेच करण्यात येत आहेत. त्यामुळे शेतामध्ये ढोपर ढोपर पाण्यात उभी असलेली शेती ही अडचणीतच आली आहे. कृषी खात्याकडून घाईगडबडीत दासगाव विभागात शेतीचे पंचनामे केले जात आहेत. त्यावर शेतकरी वर्गाकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. दासगाव परिसरात जवळपास १२० हेक्टर जमिनीवर भातशेती केली जाते. मोठ्या प्रमाणात शेतकरी भातशेतीवरच अवलंबून आहेत.