मानिवली पुलाअभावी शेतकरी त्रस्त, १९९६ मध्ये कोसळला पूल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 01:03 AM2020-08-31T01:03:24+5:302020-08-31T01:03:32+5:30
मानिवली गावातील शेतकºयांची शेती पोसरी नदीच्या पलीकडे म्हणजे पाषाणे, आर्डे आणि खाड्याचा पाडा भागात आहेत.
- कांता हाबळे
नेरळ : कर्जत तालुक्यातील मानिवली गाव आणि कळंब-पाषाणे रस्ता जोडणारा पोेसरी नदीवरील पूल १९९६ मध्ये कोसळला आहे. पोसरी नदीवर असलेला लोखंडी प्लेटचा पूल वाहून गेला असून, या पुलाअभावी मानिवली गावातील शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे. मानिवली गावातील शेतकऱ्यांची ८० टक्के शेती नदीच्या पलीकडे असल्याने आणि जाण्यासाठी पूल नसल्याने शेतक-यांना तब्बल ७ ते ८ किलोमीटरचा फेरा मारून जावे लागत आहे. मात्र, हा पूल पुन्हा उभा राहावा, म्हणून शासकीय यंत्रणेने अद्याप काहीही केले नाही.
मानिवली गावातील शेतकºयांची शेती पोसरी नदीच्या पलीकडे म्हणजे पाषाणे, आर्डे आणि खाड्याचा पाडा भागात आहेत. मानिवली गावाच्या आजूबाजूला जेमतेम २५ टक्के जमीन मानिवली ग्रामस्थांची असून, पावसाळ्यात त्या ठिकाणी जाण्यासाठी ग्रामस्थ हे होडीच्या साहाय्याने शेतकºयांना पलीकडे शेतीच्या कामासाठी सोडण्याचे काम करायचे आणि संध्याकाळी पुन्हा घरी आणायचे, परंतु १९७२ साली शेतीच्या कामासाठी पावसाळ्यात जात असताना, मानिवली येथे होडी परत येत असताना अपघात झाला होता. त्यात तीन महिलांचा बुडून मृत्यू झाला होता, तर पुरुष हे नदी पोहून बाहेर आले होते. त्यानंतर, पोसरी नदी पार करण्यासाठी वापरात असलेली होडी कायमची बंद झाली. यानंतर, १९९०ला तेथे पूल बांधण्यासाठी तत्कालीन आमदार देवेंद्र साटम यांनी पाठपुरावा केल्यानंतर, मानिवली गावाच्या ग्रामस्थांना नदी पार करण्यासाठी पुलाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.
मात्र, पाच वर्षांत पुलासाठी केवळ खांब उभे राहिले. शेवटी १९९६ मध्ये लोखंडी प्लेट टाकून पुलावरून वाहतूक सुरू झाली. मात्र, दीड वर्षांत त्या लोखंडी प्लेट कोसळल्या. दोन वर्षे पुलाची दुरुस्ती वेळेवर झाली नसल्याने अवघ्या दोन वर्षांत लोखंडी प्लेटचा पूल कोसळला आणि पोसरी नदी पार करण्याचा पर्याय निघून गेला आहे. आता केवळ मानिवली येथे नदीवर पुलाच्या पाच खांबांपैकी दोनच खांब आपले अस्तित्व सांगत आहेत. पूल कोसळल्याने आणि पुन्हा उभा होण्याची स्थिती दिसत नसल्याने नदीच्या पलीकडे शेती असलेला शेतकरी हवालदिल झाला आहे.
आमच्या गावातील शेतकºयांनी शेती करायचीच नाही काय? आणि शेती न करता कसे जगायचे? - गणेश डायरे, शेतकरी
अनेक शेतकºयांनी केली शेती बंद
मानिवली गावातील ८० टक्के शेती पोसरी नदीच्या पलीकडे आहेत. त्या पेसरी नदीवर पूल नसल्याने मानिवली गावातील शेतकºयांना पावसाळ्यात शेतीची कामे करण्यासाठी मानिवली गावातून वरई आणि पुढे चिकनपाडा गावातून माले होऊन पाषाणे येथे पोहोचावे लागते.
हा सर्व फेरा एका वेळी किमान ७ ते ८ किलोमीटरचा असून, शेतीची कामे करण्यासाठी आवश्यक अवजारे घेऊन पायी एवढे अंतर पार करणे कठीण असल्याने, मानिवली गावातील काही शेतकºयांनी आर्थिक कुवत नसल्याने शेतीची कामे करणे थांबविले आहे.
त्यामुळे हा पूल होण्यासाठी सर्वांसाठी फायद्याचे असून, मानिवली येथील पुलाच्या निर्मितीसाठी शासकीय पातळीवर कोणीही आवाज उठवताना दिसत नाही. त्याचा परिणाम मानिवली येथे पोसरी नदीवर पूल होणार की नाही? याबाबत शंका येथील शेतकरी उपस्थित करीत आहेत.