अलिबाग : अलिबाग तालुक्यातील चिंचोटी गावातील भातशेतीच्या बंधाऱ्याला समुद्राच्या पाण्याने भलेमोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे सुमारे २७ एकरांमध्ये समुद्राचे पाणी घुसून ८१० क्विंटल भाताचे सुमारे १० लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. खारभूमी विभाग आणि जिल्हा कृषी अधीक्षक विभागाने अद्याप याचा पंचनामा केला नसल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत. खारभूमी विभागाच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्याची मागणी आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीने केली आहे.चिंचोटी गावाचा समावेश आदर्श सांसद ग्राम योजनमध्ये करण्यात आला आहे. या गावामध्ये मोठ्या स्तरावर बेकायदा रेतीचे उत्खनन सुरू आहे. रेतीच्या बेसुमार उत्खननामुळे २८ आॅक्टोबरला शेतकऱ्यांच्या शेतातील बंधाऱ्याला भले मोठे भगदाड पडून शेतीला धोका पोचला आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्यामुळे येथील शेतातील पीक नष्ट झाले असल्याचे आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीचे अध्यक्ष राजाराम पाटील यांनी सांगितले. बेकायदा रेती उत्खननावर कारवाई करून शेती वाचवावी, यासाठी २ फेब्रुवारी २०१५ ला रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते; मात्र त्यावर वेळीच कारवाई झाली नसल्याने आता शेतकऱ्यांना फार मोठा आर्थिक फटका बसल्याचे पाटील यांनी सांगितले.३५ शेतकऱ्यांच्या सुमारे २७ एकर शेतामध्ये समुद्राचे पाणी घुसून ८१० क्विंटल भाताचे सुमारे १० लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अद्यापही पंचनामे करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याबाबत साशंकता आहे. पंचनामे करून लवकरच नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीने केली आहे.फेब्रुवारी महिन्यात खांड गेल्याने ती बुजविण्यासाठी ग्रामस्थांनी मेहनत केली होती. त्याची मजुरी किमान दीड लाख रुपये होते. (प्रतिनिधी)
शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत
By admin | Published: October 31, 2015 12:11 AM