शेतकऱ्यांना मिळणार नुकसानभरपाई
By admin | Published: November 2, 2015 02:11 AM2015-11-02T02:11:35+5:302015-11-02T02:11:35+5:30
समुद्राच्या पाण्याला आलेल्या उधाणामुळे चिंचोटी गावातील बंधारा फुटून शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात झालेले आर्थिक नुकसान भरून देण्यात येणार आहे.
अलिबाग : समुद्राच्या पाण्याला आलेल्या उधाणामुळे चिंचोटी गावातील बंधारा फुटून शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात झालेले आर्थिक नुकसान भरून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रोजगार हमीच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांनी केलेल्या कामाचा मोबदलाही प्रशासनामार्फत मिळणार असल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे.
२८ आॅक्टोबरला चिंचोटी येथील बंधारा फुटून सुमारे २७ एकर शेतीमधील ८१० क्विंटल भाताचे सुमारे १० लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. खारभूमी आणि कृषी विभागाने या नुकसानीचे साधे पंचनामेही केलेले नव्हते. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिध्द केल्याने लोकप्रतिनिधींसह प्रशासन यंत्रणा खडबडून जागी झाली. अलिबागचे आ. सुभाष पाटील यांनी सरकारी लवाजम्यासह शनिवारी घटनास्थळी भेट दिली. या प्रसंगी तहसीलदार प्रकाश सकपाळ, खारभूमी विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक भारती, उपअभियंता सुरेश शिरसाट, तलाठी, मंडल अधिकारी यांची तारांबळ उडाली.
चिंचोटीमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याचे आदेश आमदार सुभाष पाटील यांनी तहसीलदार प्रकाश सकपाळ यांना दिले. शेतकऱ्यांच्या शेतातील फुटलेले बांध घालण्याचे काम तातडीने सुरू करण्यात येतील, त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिन्यातही येथे खांड गेली होती. त्याची डागडुजी शेतकऱ्यांनीच केली होती. त्याचा मोबदलाही शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे खारभूमीचे कार्यकारी अभियंता अशोक भारती यांनी सांगितले. नव्याने बंधारा बांधण्यासाठी १० लाखांचा निधी देण्याची शिफारस करणार असल्याचे उपअभियंता शिरसाट सांगितले.