दासगाव :यंदा पावसाने संपूर्ण महाड तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. काही शेतकऱ्यांची संपूर्ण शेतीच नेस्तनाबूद झाली. शासनाकडून लवकरच मदत मिळण्याची आशा होती. मात्र, चार दिवसांवर आलेल्या दिवाळीच्या सणासाठी नुकसानीचा मोबदला शासनाकडून मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना असताना अद्याप एकही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा न झाल्याने दिवाळीला शासनाकडून मदत मिळण्याची आशा संपली असल्याने आता दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
परतीच्या पावसाने महाड तालुक्यातील जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान केले. शेतकऱ्यांचे वर्षाचे भातपीक नष्ट करून टाकले. शेवटी शेतकऱ्यांकडे शासनाच्या मदतीशिवाय काही एक उपाय शिल्लक राहिलेला नाही. शासनाने मदत जाहीर जरी केली असली तरी हेक्टरी दर निश्चित केला नाही. कृषी खात्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामेही पूर्ण करण्यात आले असून तसा अहवाल महसूल विभागाला कृषी विभागाने दिला आहे. लवकरच मदतीची रक्कम आपल्या खात्यात जमा होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती.
चार दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. शेतकऱ्याच्या घरामध्ये भाताचा एक दानाही नाही. खर्चाला एक रुपया नाही. अशा प्ररिस्थितीत शेतकऱ्यांनी दिवाळी सण कसा साजरा करायचा, हा प्रश्न समोर आहे. दरवर्षी हाच शेतकरी दिवाळीअगोदर भातकापणी करून भात विकून मिळालेल्या पैशांतून आनंदाने दिवाळी साजरी करीत असे. यंदा परतीच्या पावसाने केलेल्या या नुकसानीमुळे शेतकरी दिवाळी साजरी करून शकणार नाही.
शासनाकडून काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते की, शेतकऱ्यांची दिवाळी गोड जाईल. मात्र गोडतर राहिली बाजूला, दिवाळी मोठ्या अडचणीत आली आहे. काही शेतकऱ्यांनी आता शिल्लक राहिलेले भात कापून सुकवून ते विकून जे पैसे मिळतील त्यामध्ये दिवाळी साजरी करण्याचे ठरविले आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे शेतकरी यंदा दिवाळी आनंदाने साजरी करू शकणार नाहीत.