माणगाव तालुक्यातील भातशेती पाण्यात गेल्याने शेतकरी चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 02:12 AM2018-07-17T02:12:32+5:302018-07-17T02:12:38+5:30
जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून संपूर्ण कोकणासह रायगड जिल्ह्याला सततच्या पावसाने झोडपले असल्याने माणगाव तालुक्यातील हजारो हेक्टर भातशेती पावसाच्या पाण्याखाली आली आहे.
माणगाव : जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून संपूर्ण कोकणासह रायगड जिल्ह्याला सततच्या पावसाने झोडपले असल्याने माणगाव तालुक्यातील हजारो हेक्टर भातशेती पावसाच्या पाण्याखाली आली आहे. यामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. पावसाचे, नदीनाल्यांचे, पुराचे पाणी शेतात राहिल्याने भातशेती खराब झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग नुकसानीमुळे घाबरला आहे.
शेतकऱ्यांनी पारंपरिक पध्दतीने भातशेतीची लावणी करून घेतली. या संततधार पावसाने काही भागातील लावणीसुध्दा करावयाची बाकी राहिली आहेत तर भातशेतीचे आवाण(रोप) चांगली उगवली, परंतु या पावसाचे पाणी तुडुंब शेतात भरल्याने रोपे कुजली आहेत. त्यामुळे शेतकरी आवाण (रोप) लावण्याकरिता आवाण शोधत फिरताना दिसत आहेत.
माणगाव तालुक्याची भौगोलिक स्थिती पाहता सदर डोंगर, टेकड्या, नद्या-नाले यांनी व्यापले आहे.त्यामुळे या भागात पावसाळ्यात जोरदार अतिवृष्टी झाल्यावर डोंगर माथ्यावरील पावसाचे पाणी त्या त्या ठिकाणच्या नाल्यातून ओहळाद्वारे नदीत जाते. या पाण्यामुळे माणगावमधील काळ नदीस पूर येते. पुराचे पाणी सखल भागातील भातशेतीत घुसल्याने भातशेती खराब झाली आहे. पर्यायी शेतकºयाची मेहनत व आर्थिक नुकसान माणगाव तालुक्यात झाले आहे.
माणगाव विभागात गोरेगाव विभाग, पेण- खरवली विभाग, मोर्बा विभाग, लोणेरे विभाग, इंदापूर विभाग, निजामपूर विभागातील शेतकºयाची हजारो हेक्टर भातशेती पाण्याखाली येवून नुकसान झाले आहे.
शासनाने त्वरित पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करून शेतकºयांना मदत मिळावी ही मागणी होत आहे.
>संततधार पावसाने शेतात पाणी तुंबल्याने सखल भागातील शेती कुजून खराब झाल्याचे, तसेच लावणी केलेली शेती सुध्दा खराब होवू लागल्याचे निदर्शनास आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार ३०० ते ४०० एकर शेतजमीन तालुक्यात खराब झाल्याचे दिसते, तरी उर्वरित रोपे शेतकºयांनी एककाडी पध्दतीने शेती करावी जेणेकरून रोपे कमी लागतील.
-पी.बी. नवले, तालुका कृषी अधिकारी, माणगाव
>आमच्या शेतीची लावणी लवकर केली होती. परंतु या सततच्या पडणाºया पावसाने आमची भातशेती पाण्यात बुडून गेल्याने खराब झाली आहे.
-उदय गायकवाड, शेतकरी
माझ्या शेतीमधील आवाण पावसाने खराब झाले आहे. आता या शेतीत आवाण शोधण्याकरिता मी फिरत आहे.
-दुर्वास म्हशेळकर,
शेतकरी, गोरेगाव