शेतकऱ्यांना लागली कर्जफेडीची चिंता
By admin | Published: May 6, 2015 11:31 PM2015-05-06T23:31:22+5:302015-05-06T23:31:22+5:30
कर्जत तालुक्यातील चिल्हार नदीवर लोभेवाडी - पत्र्याची वाडी येथे २०१२ मध्ये बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्याला गळती लागली आहे.
राहुल देशमुख, नेरळ
कर्जत तालुक्यातील चिल्हार नदीवर लोभेवाडी - पत्र्याची वाडी येथे २०१२ मध्ये बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्याला गळती लागली आहे. पाणी गळतीमुळे बंधारा कोरडा पडत आहे. परिणामी बंधाऱ्याचे पाणी मिळेल म्हणून केलेली भाजीपाला शेती सुकून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे घेतलेले कर्ज फेडायचे कसे, या चिंतेत शेतकरी आहेत.
तीन वर्षांपूर्वी भीमाशंकर डोंगरात उगम पावलेल्या चिल्हार नदीचे पात्र उन्हाळ्यात कोरडे असते. परिणामी नांदगाव खांडसपासून कोलिवलीपर्यंतच्या गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. चिल्हार नदीच्या मार्गात असलेल्या गावांना पाण्याचा उगम निर्माण व्हावा, म्हणून राज्य सरकारने पाटबंधारे विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून नदीमध्ये कोल्हापूर टाईपचे सिमेंट बंधारे बांधण्याचा कार्यक्र म हाती घेतला होता. साधारण ५० मीटर लांबीचा सिमेंट बंधारा जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून पत्र्याची वाडी - लोभेवाडी येथे बांधला होता. कोल्हापूर टाईपचे बंधारे अशा कोरड्या असलेल्या नदीमध्ये पाणी साठवून ठेवण्यात महत्त्वाचे ठरले होते. कारण पत्र्याची वाडीतील अनेक शेतकरी यांनी बंधाऱ्यात अडविलेल्या पाण्याचा वापर भाजीपाला पिकविण्यासाठी करीत होते. किमान १५ शेतकरी या भागात भाजीपाला शेतीचे नियोजन करीत असताना यावर्षी बंधारा पाणी गळतीमुळे कोरडा पडला आहे. एप्रिल महिन्याआधी बंधारा कोरडा पडल्याने भाजीपाला शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे.
परिणामी भाजीपाला शेतीसाठी प्रसंगी कर्ज काढून शेती करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांवर संकट आले आहे. यावेळी बंधारा लवकर रिकामा होईल, असे माहीत असते तर भाजीपाला शेती केली नसती, असे जैतू सका पारधी या शेतकऱ्याने सांगितले. आता घेतलेले कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न कायम असताना यावर्षी पाणी गळतीची बाब लक्षात आली. आता पाटबंधारे विभागाने त्यावर पावसाळ्याआधी उपाययोजना करावी म्हणजे पुढच्या वर्षी अशी स्थिती पुन्हा भाजीपाला शेतकरी यांच्यावर येणार नाही, अशी अपेक्षा पारधी यांनी व्यक्त केली आहे.