फार्महाउस मालकाने बंद केली धोत्रेवाडीची विहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 11:54 PM2019-04-09T23:54:56+5:302019-04-09T23:57:09+5:30
झाडांना वापर : पाणी देण्याची आदिवासी बांधवांची मागणी
- कांता हाबळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : कर्जत तालुक्यातील धोत्रेवाडीमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, तेथील दोन विहिरीपैकी एक विहीर आटली आहे, तर दुसरी विहीर खासगी जमीन मालकाने आपल्या फार्महाउसमध्ये कुंपणबंद केली आहे. शासनाच्या निधीमधून बांधण्यात आलेल्या विहिरीमधील पाणी फार्महाउस मालक वीज पंप लावून आपल्या बागेतील झाडांना घालत आहेत. मात्र, त्या वेळी बाजूच्या गावातील लोकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळाले आहे, तर शासनाच्या निधीमधून बांधलेल्या विहिरीचे पाणी मिळावे यासाठी आता आंदोलन करण्याचा इशारा आदिवासींनी दिला आहे.
कर्जत तालुक्यातील उन्हाळ्याने पाणीटंचाईचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त भागातील ग्रामस्थांची वणवण वाढली आहे. तालुक्यातील तब्बल ३९ गावे आणि ५७ आदिवासी वाड्या पाणीटंचाईग्रस्त आहेत. असे असताना पाथरज ग्रामपंचायतीमधील धोत्रेवाडीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी लोकांना वणवण करावी लागत आहे. आदिवासी विकास विभागाने त्या वाडीसाठी दोन विहिरी खोदून दिल्या आहेत, त्यातील एका विहिरीने तळ गाठला असून दुसरी विहीर पाण्याने तुडुंब भरली आहे. मात्र, ती विहीर शेतकरी असलेल्या खासगी व्यक्तीच्या जागेत खोदल्यानंतर ही जमीन नवी मुंबई येथील व्यक्तीने खरेदी केली आणि सरकारी निधीमधून खोदण्यात आलेली विहीर त्या नवीन जमीन मालकाची झाली. मात्र, त्या आधी ती विहिरी धोत्रेवाडीमधील आदिवासी लोकांसाठी पिण्याचे पाणी देत होती. ती विहीर संबंधित जमिनीचे मालक नवीन झाल्याने विहीर कुंपणात गेली. नवी मुंबईमधील त्या जमीन मालकाने आपल्या जमिनीला कुंपण घातल्याने आणि आतमध्ये कोणालाही प्रवेश देण्यास विरोध केल्याने धोत्रेवाडीमधील लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
धोत्रेवाडीमधील आदिवासी लोकांनी त्या जमीन मालकाविरु द्ध गतवर्षी जोरदार आवाज उठविल्यानंतर कर्जत तहसील कार्यालयाने विहिरीचे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मे २०१८ मध्ये तहसीलदारांनी पाठ फिरली आणि पुन्हा त्या फार्म हाउस मालकाने आपल्या जमिनीतील विहिरीजवळ येण्याचा मार्ग बंद केला.
यावर्षी धोत्रेवाडीमध्ये पुन्हा एकदा पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवली असून शासनाच्या निधीमधून बांधलेली विहीर फार्म हाउस मालकाने कुंपण घालून बंद केली आहे. हा जमीन मालक शासनाच्या निधीमधून बांधलेल्या विहिरीचे पाणी वीज पंप लावून आपल्या फार्महाउसमधील झाडांना टाकत आहे.त्यामुळे स्थानिक आदिवासी संतप्त झाले असून त्यांनी शासनाच्या निधीमधून बांधलेल्या विहिरीचे पाणी मिळावे यासाठी आता आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश काळात पिण्याच्या पाण्यासाठी कोणालाही अडवू शकत नाही. या काळात झाडांपेक्षा मनुष्यप्राणी महत्त्वाचा समजला जातो, त्यामुळे तक्र ारी प्राप्त होताच विहिरीचे अधिग्रहण करण्याची कार्यवाही केली जाईल.
- अविनाश कोष्टी, तहसीलदार, कर्जत
धोत्रेवाडीमधील विहिरीत भरपूर पाणी असून देखील आमच्या वाडीतील महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी वणवण करावी लागत आहे.आम्हाला आमच्या विहिरीचे पाणी हवे आहे.
- जयवंती हिंदोळा,
ग्रामस्थ